मराठी पंतप्रधान झाल्याशिवाय ‘अभिजात’ची राजमान्यता नाही- डॉ. महेश केळूसकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 01:34 PM2022-03-01T13:34:05+5:302022-03-01T13:34:37+5:30
ठाणे : मराठी भाषा अभिजात आहेच, अशी समस्त मराठी भाषिकांची भावना आणि समज असली तरी कुठल्याही पक्षातील मराठी पंतप्रधान ...
ठाणे : मराठी भाषा अभिजात आहेच, अशी समस्त मराठी भाषिकांची भावना आणि समज असली तरी कुठल्याही पक्षातील मराठी पंतप्रधान झाल्याशिवाय तिला केंद्रीय राजमान्यता मिळणार नाही, असे मत रविवारी ठाणे येथे ज्येष्ठ कवी व भाषा अभ्यासक डॉ. महेश केळूसकर यांनी ‘बोली मराठीच्या’ या परिसंवादात आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्राने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या परिसंवादात वाडवळी, कुणबी, मालवणी या मराठीच्या बोलींच्या आणि प्रसारमाध्यमातील बोलींच्या वर्तमान स्थितीचा आढावा आणि सादरीकरण विविध भाषा अभ्यासकांनी केले. केळवे-महिमच्या प्रा. स्मिता पाटील यांनी वाडवळी बोलीतील निसर्ग चित्रण व वाडवळी लोकजीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले, तर शहापूरच्या आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रा. संजय जगे यांनी कुणबी भाषेतील कविता सादर केल्या.
शैक्षणिक अभ्यासक्रमात मराठीच्या बोलींचा वापर वाढविण्याची मागणी त्यांनी केली. पत्रकार भारती सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या वार्ताहरांना त्यांच्या बोली भाषेतून वृत्तांकन करण्याची मुभा असल्याचे सांगितले. लेखक-दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्याशी किरण वालावलकर यांनी संवाद साधला. मालवणी लोकबोली साता-समुद्रापार पोहोचलेली असल्याचे मत पेडणेकर यांनी मांडले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले उपस्थित होते. परिसंवादाचे प्रास्ताविक सचिव अमोल नाले यांनी केले.