महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठा नाही, लसीकरणाचा वेग मंदावला
By अजित मांडके | Published: November 7, 2022 04:39 PM2022-11-07T16:39:51+5:302022-11-07T16:41:52+5:30
कोरोना कमी झाला असला तरी लसीकरण थांबता कामा नये असे बोलले जात असले तरी देखील ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठाच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे : कोरोना कमी झाला असला तरी लसीकरण थांबता कामा नये असे बोलले जात असले तरी देखील ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठाच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कोव्हीशिल्डची लस घेणाऱ्यांना आता दुसरा किंवा बुस्टर डोसही मिळेनासा झाला आहे. तर लहान मुलांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कॉब्रोव्हस ही लसही मागील १० दिवसापासून ठाण्यात उपलब्ध होऊ शकली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे ठाणमहापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहमेंतर्गत शहरात ३५ केंद्राच्या माध्यमातून लस दिली जाते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आले होते. त्यानुसार कोरोनाचा प्रभाव जेव्हा दिसत होता. तेव्हा लसीकरण देखील वेगाने सुरु होते. आता कोरोनाचा वेग मंदावला असतांना लसीकरणाचा वेगही मंदावल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे शहरात आतापर्यंत १५ ते १७ वयोगटातील ९०.३० टक्के जणांनी पहिला डोस आणि दुस:या डोसचे प्रमाण ७१.४० टक्के एवढे आहे. तर १८ वर्षावरील नागरीकांच्या पहिल्या डोसचे प्रमाण १००.१० टक्के आणि दुस:या डोसचे प्रमाण ८०.१६ टक्के एवढे आहे. तर बुस्टर डोस केवळ १ लाख ६७ हजार २३० नागरीकांनी घेतला आहे.
लसीकरण शिल्लक असतांनाही आता राज्य किंवा केंद्राकडून महापालिकेकडे कोव्हीशिल्डचा साठा मागील चार आठवडे म्हणजेच महिनाभरापासून उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे दुसरा किंवा बुस्टर डोस कुठे घ्यायचा असा पेच नागरीकांमध्ये निर्माण झाला आहे. दुसरीकडे लहान मुलांना देण्यात येणा:या कॉब्रोव्हस ही लसही मागील १० दिवसापासून उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. याचाच अर्थ ठाण्यात लसीकरण सध्या थांबले असल्याचेच दिसत आहे.
दुसरीकडे शहरात सध्या केवळ कोव्हॅक्सीनचा साठा उपलब्ध असल्याने त्यामाध्यमातून लसीकरण सुरु असल्याची माहिती महापालिकेने दिली. परंतु लस उपलब्ध नसल्याने देखील लसीकरण केंद्रावरील गर्दी देखील ओसरली असल्याचे चित्र दिसत आहे.