देशी वाणाची बियाणे वापरण्यास पुढाकार घेतला पाहिजे - बीजमाता राहीबाई पोपेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:38 PM2020-02-25T16:38:44+5:302020-02-25T16:41:05+5:30
स्मार्ट उद्योजक उद्योगोपयोगी 'सीड मदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिबाई पोपेरे यांचे आज व्याख्यान पार पडले.
ठाणे : ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात "डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेत मंगळवारी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे "पारंपरिक बियाणे व शेतकरी" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. देशी वाणाची बियाणे वापरण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे ते यावेळी म्हणाल्या.
ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात मोलाची भर घालणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाचे अध्वर्यू राहिलेल्या स्वर्गीय डॉ वा ना बेडेकर यांच्या तपस्वी जीवनाला श्रद्धांजली म्हणून ही व्याख्यानमाला जोशी बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केली आहे. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज देशात हायब्रिड शेती जास्त प्रमाणात वाढलीय. शाश्वत शेती करण्यासाठी जुन्या धान्याची वाणं आज खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा पारंपारिक आणि देशी वाणाचं जतन केले पाहिजे असे राहिबाई पोपेरे यांनी सांगत मी 'देशी बियाण्यांची बँक' चालवते असा उल्लेख हि त्यांनी केला. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहिबाई खरंतर ज्ञानाने समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख 'मदर ऑफ सीड'असा केला होता. अहमदनगर जिल्ह्यात कोंभाळणे हे एक आदिवासी खेडेगाव. राहिबाई मुळच्या याच गावच्या. राहिबाईंच्या वडिलांकडून त्यांना खूप ज्ञान मिळाले, असे त्या सांगतात. वडिल नेहमी म्हणायचे, 'जुनं ते सोनं' त्याचा अर्थ राहिबाईंनी खूप चांगला समजून घेतला. राहिबाईंच्या आजुबाजुच्या परिसरातील आजही ५० टक्के शेतकरी हा पारंपरिक पद्धतीची देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतो. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी प्रास्ताविकात बहिणाबाईच्या "माझी माय सरसोती" या कवितेचा संदर्भ देत राहीबाई पोपरे यांच्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संयोजन जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ विमुक्ता राजे यांनी केले. व्याखानास विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्याख्यान झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांचा तास रंगला