इंग्लंडमध्ये मुलाच्या घरी वर्णद्वेषातून जाळपोळ नाही; आईवडिलांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:18 AM2018-09-20T04:18:55+5:302018-09-20T04:19:17+5:30
पोलीस ३२ तासांनंतर अवतरल्याने वाढले गूढ
डोंबिवली : इंग्लंडमध्ये १९ वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या आणि मूळ डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या मयूर ऊर्फ मॅक कार्लेकर यांच्या इंग्लंडमधील घराबाहेरील बगिच्याची शनिवारी झालेली जाळपोळ वर्णद्वेषातून केली गेली नसल्याचा दावा त्यांच्या डोंबिवलीत राहणाऱ्या आईवडिलांनी केला. मात्र, आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दल २० ते २५ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले, तर पोलीस ३२ तासांच्या कालावधीनंतर अवतरल्याबद्दल कार्लेकरांच्या आईवडिलांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
फडके रोडवरील ‘शलाका’ इमारतीमध्ये मयूर यांचे वृद्ध आईवडील राहतात. वडील हरिश्चंद्र हे रेल्वेमधून, तर आई मंदा या भारत संचार निगममधून निवृत्त झाल्या आहेत. पूर्वी कल्याणमधील कोळसेवाडीत राहणारे कार्लेकर कुटुंबीय सध्या डोंबिवलीत राहण्यास आले आहे. इंग्लंडमध्ये नक्की काय झाले, हे माहीत नाही. मात्र, वर्णद्वेषातून हे कृत्य झाले नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
शिर्डी-कोपरगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेतलेले मयूर हे कॉम्प्युटर इंजिनीअर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९९ साली चांगल्या पगाराची नोकरी इंग्लंडमध्ये पत्करली. त्यानंतर, २० वर्षांचा कालावधी उलटल्यावर मयूर यांना इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले. दोन वर्षांपूर्वीच मुलांना शाळा लांब पडत असल्याने मयूर यांनी केंट येथे घर घेतले. याठिकाणीच सध्या ते पत्नी रितू, मुलगा यश आणि मुलगी साची यांच्यासह राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या घराबाहेरील बगिचा तसेच घराचा काही भाग काही व्यक्तींकडून जाळण्यात आला. या सर्व घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना फोनवरून दिली. मात्र, एक नव्हे तर सात ते आठवेळा संपर्क साधल्यावर तब्बल ३२ तासांनंतर पोलीस उगवले. तत्परतेने हालचाल करून गुन्हेगारांचा माग काढण्याकरिता जगप्रसिद्ध असलेले इंग्लंडचे पोलीस यावेळी कुचकामी ठरल्याचा आरोप मयूरची आई मंदा यांनी ‘लोकमत’कडे केला आहे.
भारतीयांना इंग्लंडमध्ये नागरिकत्व मिळूनही ते असुरक्षित जीवन जगत असल्याची बाब या घटनेमुळे उघड झाली आहे. भेदरलेल्या अवस्थेत मयूरने भारतात फोन केला, तेव्हा सर्वप्रथम सिगारेटने आग लागल्याचे सांगितले होते. मात्र, ही आग सिगारेटमुळे लागलेली नाही. इंग्लंडमध्ये वरचेवर पाऊस पडतो, त्यामुळे तेथील झाडेझुडुपे, गवतांमध्ये सतत ओलावा असतो. त्यामुळे, ही आग सिगारेटने लागलेली नसून कोणीतरी लावल्याची शक्यता मयूरच्या आईने व्यक्त केली.
धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ३२ तासांनंतर आलेल्या इंग्लंडच्या पोलिसांनी घटनेची माहिती घेतली व परिसराची पाहणी करून मयूर यांना अजब सल्ला दिला. पोलीस म्हणाले की, तुम्ही हा सर्व प्रकार सोशल मीडियावर पसरवा. त्यामुळे भारतीय दूतावास त्याची दखल घेईल. घटनेच्या तपासाबद्दल इंग्लंडमधील पोलिसांनी ब्र देखील काढला नाही. नाइलाजाने मयूरने घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
या संपूर्ण घटनेमागे नेमके काय कारण आहे. मयूरला मदत का मिळाली नाही. आग कशामुळे लागली व कोणी लावली, याचा तपास होणे गरजेचे आहे. कोणीतरी जाणूनबुजून ही आग लावण्याचा प्रयत्न केल्याचे घटनेच्या दोन दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेजमुळे आम्हाला समजले. मयूरला नागरिकत्व मिळाले असल्याने त्याला योग्य त्या सोयीसुविधा इंग्लंड प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे. मात्र, त्या का मिळाल्या नाहीत, याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- मानसी कार्लेकर, मयूरची वहिनी
इंग्लंडमध्ये झालेला प्रकार हा वर्णद्वेषाचा नसून काहीतरी वेगळ्या कारणाने घडला असल्याची शक्यता आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये मी स्वत: पाच ते सहा महिने राहिले आहे. त्यामुळे तेथील आजूबाजूचे रहिवासी हे वेगवेगळ्या देशांतील आहेत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा भेदभाव जाणवला नाही. मात्र, अशा प्रकारची गंभीर घटना घडल्यामुळे मयूरला फोन, मेसेजद्वारे तो देश सोडून आपल्या देशात येण्याचा सल्ला दिला.
- मंदा कार्लेकर, मयूरची आई
मयूर आणि माझी मागील १५ वर्षांपासून मैत्री असून आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नेहमी भेटत असतो. बहुसंख्य भारतीय आमच्या परिसरामध्ये वास्तव्यास आहेत. इंग्लंडमध्ये वावरताना आम्हाला कुठल्याही प्रकारे वर्णद्वेष जाणवला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ही जाळपोळीची माहिती कळली.
- दीपक पिल्ले, मयूरचा इंग्लंडमधील मित्र