ठाण्यात २०१९ नंतर मोठा गृहप्रकल्प नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:12+5:302021-08-28T04:44:12+5:30
ठाणे : कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाल्याने पालिकेवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या ...
ठाणे : कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाल्याने पालिकेवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या नव्या नियमामुळे पालिका हद्दीत २०१९ नंतर कोणतेही नवे मोठे गृहप्रकल्प आलेच नसल्याची माहिती पुढे आली आहे. किंबहुना पालिकेकडे परवानगीसाठीदेखील मोठ्या विकासकांनी प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. त्याचा थेट परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला आहे.
कोरोनामुळे मागील वर्षापासून पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दोन वर्षांपूर्वी पालिकेचा आर्थिक डोलारा शहर विकास विभागामुळे काहिसा सावरला होता. त्यातून ५०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न शहर विकास विभागाकडून पालिकेला मिळाले होते. २०२० पासून कोरोनाने डोके वर काढल्याने त्याचा परिणाम शहर विकास विभागावरही झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी केवळ २६२ कोटींचेच उत्पन्न शहर विकास विभागाकडून मिळाले होते. त्यानंतर, यंदादेखील शहर विकास विभागाला ३४२ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ७७.८१ कोटींचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. हे उत्पन्नदेखील काही छोटे गृहप्रकल्प मंजुरीसाठी आले असल्याने मिळाले आहे. काही मोठ्या विकासकांनी दोन वर्षांपासून जागा घेऊन गृहसंकुले उभारण्याचे निश्चित केले आहे. परंतु त्यांनादेखील ते शक्य झालेले नाही.
आधी रेराचा फटका विकासकांना बसला. त्यातून सावरत नाही, तोच फ्लेमिंगो अभयारण्याच्या नियमाचा सर्वाधिक फटका विकासकांना बसला आहे. या नियमामुळे विकासकांना खाडीपासून १० किमीपर्यंत प्रकल्प उभारताच येणार नाहीत. हा नियम शिथिल होण्याची वाट विकासक पाहत आहेत. त्यामुळेच २०१९ नंतर ठाण्यात नव्याने कोणताही मोठा नवा गृहप्रकल्प तयार होत नसल्याची माहिती पालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आली आहे. याचा पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शहर विकास विभागाचे उत्पन्न घटल्याने पालिकेची मदार आता मालमत्ता आणि पाणीपट्टीवरच अवलंबून आहे.