ग्लोबलमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीतही निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:09+5:302021-08-24T04:44:09+5:30
ठाणे : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने ग्लोबलमधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. परंतु, महापालिकेने ज्या डॉक्टर, परिचारिकांना ...
ठाणे : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने ग्लोबलमधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. परंतु, महापालिकेने ज्या डॉक्टर, परिचारिकांना कंत्राटी स्वरुपात सेवेत घेतले होते, त्यांनाच कमी केले जात असल्याचा आरोप सोमवारी त्यांनी केला, तर दुसरीकडे मला २५ टक्केच निधी मिळत असल्याने सर्वांना कामावर घेणे शक्य नसल्याचा मुद्दा ठेकेदाराने उपस्थित केला. यानंतर जर भाजप याच रकमेवर सर्वच कर्मचाऱ्यांना एखादा ठेकेदार सामावून देत असेल तर त्याची निवड करू, असे सांगून महापौर नरेश म्हस्के यांनी भाजप नेत्यांची बोलती केली. यानंतर एकूणच जवळजवळ दोन तास चाललेल्या या बैठकीत अखेर कोणताही तोडगा निघाला नाही.
काही दिवसांपासून ग्लोबलमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर सोमवारी या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यायचा, यावर महापौरांच्या दालनात या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नारायण पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे, संदीप शिंदे यांच्यासह ठेकेदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, तसेच ठेकेदाराकडून महापालिकेमार्फत जे डॉक्टर, नर्सेस घेण्यात आले होते, त्यांनाच आता कामावर कमी केले जात असल्याचा आरोप डॉक्टर आणि नर्सेसने केला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना किमान दोन महिन्यांचा थकीत पगार मिळावा, अशी मागणी मनोज शिंदे यांनी केली.