एनआरसी कामगार वसाहतीच्या जागेत वृक्षतोड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:50+5:302021-03-06T04:38:50+5:30
कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कामगार वसाहतीचे पाडकाम सुरू असून, तेथे वृक्षतोडही केली जात असल्याचा आरोप एनआरसी कामगार संघर्ष ...
कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कामगार वसाहतीचे पाडकाम सुरू असून, तेथे वृक्षतोडही केली जात असल्याचा आरोप एनआरसी कामगार संघर्ष समितीने केला होता. मात्र, गुरुवारी पाहणी दौऱ्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले की, वसाहतीमधील वृक्ष तोडलेले नाहीत. या पाहणीचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
एनआरसी कामगार वसाहत आणि परिसरात बरीच मोठी झाडे आहेत. अदानी उद्योग समूहाकडून कामगार वसाहतीमधील घरांचे पाडकाम सुरू असून, त्याला कामगार विरोध करीत आहेत. घरांचे पाडकाम केले जात असताना वृक्षतोडही केली जात आहे. मात्र, त्यासाठी संबंधितांनी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी घेतली आहे का, असा सवाल महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे कामगारांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्या वेळी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश जाधव यांना आयुक्तांना दिले होते. त्यानुसार जाधव यांनी गुरुवारी एनआरसी कामगार वसाहत परिसराची पाहणी केली. या वेळी कामगार संघर्ष समितीचे सुभाष पाटील, उदय चौधरी, भीमराव डोळस, रामदास पाटील यांच्यासह असंख्य महिला व पोलिसांच्या गोपनीय शाखेचे पोलीस उपस्थित होते.
कामगारांनी या वेळी वृक्षतोड झाल्याचा आरोप केला. पाहणीनंतर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, ‘कंपनीच्या कामगार वसाहतीचा परिसर हा हजारो झाडांनी व्यापलेला आहे. त्यातील काही झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत. वसाहतीमधील एक बांधकाम तोडले जात असताना त्याचा भाग एका झाडावर कोसळून ते झाड पडले आहे. बाकी कोणतीही झाडे तोडलेली नाहीत. यासंदर्भातील अहवाल प्रशासन प्रमुख असलेल्या आयुक्तांना सादर केला जाणार आहे.’
-----------------