ठाणेकर आणि काश्मिरी यांच्यात काही फरक वाटला नाही - शैलेंद्र मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 04:38 PM2020-07-12T16:38:15+5:302020-07-12T16:47:13+5:30
जम्मू काश्मीर मधील कठूआ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी काश्मीरमधील किस्से, प्रसंग सांगितले.
ठाणे : काश्मीरमध्ये माझी नियुक्ती झाली तेव्हा तेथे गेल्यावर कश्मिरी आणि ठाणेकर यांच्यात काही फरक जाणवला नाही. त्यांच्याही मागण्या त्याच आहेत. तेथील लोक मनमोकळे आहेत. सुरुवातीला मलाही वाटले आपण कसे जुळवून घेऊ पण लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला. तेथील सहकाऱ्यांशी माझी चांगली मैत्री झाली. भाषेची अडचण येईल असे वाटले होते पण मराठी आणि काश्मिरी या दोन्ही भाषा जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे ती भाषा मला लवकर समजायला लागली. जेव्हा स्थानिक बोली भाषा आपल्याला समजते तेव्हा स्थानिकांच्या भावनाही समजतात असे कठूआ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी आपले अनुभव कथन केले.
कश्मीर हा खूप टिपिकल विषय आहे. जिथे जास्त समस्या तिथे काम करण्याची अधिक संधी. कश्मीरमध्ये तणाव आहे पण मी त्याकडे तणाव म्हणून पाहिले नाही. भारतीय संविधानात जी शिकवण दिली त्याचाच वापर करून मी तेथे चांगल्या गोष्टी केल्या आणि तेथील लोकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. आपण जे काम करतो त्याला जेव्हा लोक स्वीकारतात त्याचा आनंद वेगळा असतो. तेथील स्थानिक लोक माझ्या कामाला पसंती देत गेले. चांगले काम करत राहणे हा माझ्या तणावमुक्तीचा मार्ग आहे असेही ते म्हणाले. त्यांचे बालपण ठाण्यात गेले हे सांगताना प्रशासकीय सेवेत ते कसे आले हा प्रवास त्यांनी उलगडला. या सेवेची परीक्षा देताना माझा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे ही मिश्रा म्हणाले. कोरोनाचे नियंत्रण सध्या कोणाच्या हातात नसले तरी, कोरोनाची वाटणाऱ्या भीतीचे नियंत्रण आपल्या हातात आहे. आपण पोलीस, डॉक्टर याना सहकार्य केले तर आपला बचाव होईल असे सांगत त्यांनी सध्याच्या वातावरणाचा लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर केला. विद्यार्थ्यांनी पोलीस या क्षेत्रात यावे हे सांगताना ते म्हणाले, प्रत्येकाला आर्मीचा अभिमान आहे, त्यांची जीवनशैली दुरून सर्वानाच आवडते पण आर्मीचे डिसकमफॉर्ट्स कोणाला नको असतात. मात्र सुखसुविधायुक्त आयुष्य ही हवे असते. याचे मिश्रण म्हणजे पोलीस क्षेत्र. इथे नागरी जीवन आणि आर्मी सारखे प्रशिक्षण दोन्ही मिळते. प्रत्येकाने या क्षेत्राकडे नोकरी म्हणून नव्हे तर सेवा म्हणून पहावे. समाजाला जवळून पाहण्याची संधी पोलीस हे क्षेत्र देते. त्यामुळे या क्षेत्राकडे वळा असा सल्ला त्यांनी दिला
आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिश्रा यांची मुलाखत निवेदक मकरंद जोशी यांनी घेतली. प्रा. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर, पोलीस आणि नागरिक याना वेगळे करून पाहणे बरोबर नाही. कोरोनाला घाबरू नका, सुरक्षिततेचे नियम पाळा हे सांगण्यासाठीच पोलीस आहेत असे मिश्रा पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेचे कौतुक केले. ते म्हणाले स्वतःच्या बजेटमधून प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र चालविणारी ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका आहे.