रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:41+5:302021-08-21T04:45:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कोट्यवधींचा कर केडीएमसीला भरूनही टिटवाळ्यातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांतूनच जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : कोट्यवधींचा कर केडीएमसीला भरूनही टिटवाळ्यातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांतूनच जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. नियोजित रस्त्यांच्या कामाचे किमान आठ ते नऊ कोटी रुपयांचे प्राकलन धूळ खात पडून आहे. मात्र, महापालिकेकडे निधी नसल्याने डांबरीकरण केले जात नसल्याची माहिती ‘केडीएमसी’च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी दिली आहे.
केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील चार ठिकाणी रस्त्यांची साफ चाळण झाली आहे. जुलैमध्ये दोनदा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण रस्तेच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. टिटवाळा-बल्याणी रस्ता, मोहिली, गाळेगाव, उंभर्णी व आंबिवली गावांतील रस्ते पाच वर्षांपासून खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहनाने प्रवास करणे अवघड झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होत आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले आहे. मात्र, खासदार-आमदार यांनी निधी मिळविण्यासाठी कधी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. डांबरीकरणासाठी खासदार-आमदार निधी मिळाला नसल्याने आता महापालिकेनेही हात वर करीत निधी नसल्याचे सांगून टाकले आहे. त्यामुळे रस्त्यांच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
टिटवाळा-बल्याणी रस्त्यांवर सतत वाहतूक सुरू असताना या रस्त्यांवर महापालिकेचे प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करीत आहे. बांधकाम विभाग खड्ड्यांत खडी टाकायचे काम मोठ्या जोमाने करताना दिसत आहे. कोरोनामुळे विकासकामांना खीळ बसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
-------
कोरोनाकाळात महापालिकेच्या क्षेत्रात विकासकामे झालेली नाहीत. निधी उपलब्ध नसल्याने ‘अ’ प्रभागातील चार रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे थांबविली आहेत. या कामांचे प्राकलन तयार आहे.
- सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, केडीएमसी
--------
‘अ’ प्रभागातील रस्त्यांबाबत वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच निधी मंजूर असूनही महापालिकेचे प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करीत आहे.
- नमिता पाटील, माजी नगरसेविका
-------
आम्ही प्रशासनाला कोट्यवधींचा कर भरत असून, आम्हाला प्रशासन काय सुविधा देते? येथील रस्त्यांची अवस्था पाच वर्षांपासून अतिशय दयनीय आहे. सुविधा नाहीत तर आम्ही कर का द्यावा, हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
- विवेकानंद कानेटकर, ज्येष्ठ नागरिक, टिटवाळा
------------