कोरोनामुळे खबरदारी : नवरात्रोत्सवात गरबा-रासचा घुमर नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:21 AM2020-09-29T00:21:59+5:302020-09-29T00:22:45+5:30
कोरोनामुळे खबरदारी : सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रमांचा संकल्प
स्रेहा पावसकर ।
ठाणे : कोरोनामुळे यंदा कोणतेही सण, उत्सव साजरे झालेले नाहीत. अनावश्यक खर्च टाळून आणि सामाजिक भान राखत गणोशोत्सव साजरा झाला. त्याच धर्तीवर ठाण्यात पुढील महिन्यात नवरात्रोत्सवही होणार आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा, दांडियाचा घुमर न घुमता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम आयोजिले जाणार आहेत.
कोरोनामुळे यंदा गर्दी होतील, असे सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव आयोजित करण्यावर बंदी आहे. त्याचा परिणाम यंदा सर्वच सणउत्सवांवर पाहायला मिळाला. गुढीपाडवा, दहीहंडी, वारी, गणोशोत्सव असे सगळे सणउत्सव दरवर्षीप्रमाणे थाटात साजरे न होता केवळ शास्त्र म्हणून मोजक्या माणसांच्या उपस्थितीत छोटेखानी पद्धतीने साजरे झाले. अनेक ठिकाणी तर ते रद्दच झालेच. दहीहंडी, गणोशोत्सवाप्रमाणेच ठाण्यात नवरात्रोत्सवाचीही धूम असते. देवीच्या आगमनाबरोबरच नऊ दिवस चालणारे गरबा, दांडिया-रास तरुणाईला आकर्षित करणारे ठरतात. मोठ्या संख्येने आणि वेशभूषेसह तरुणाई ठाण्यातील विविध मंडळांच्या गरबा-रासमध्ये सहभागी होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाण्यात हे दांडिया-रास रंगणार नाहीत. नवरात्रीचा जागर होणार नाही. परंतु सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्याकडे आयोजकांचा कल दिसतो आहे. खारीगाव-पारसिकनगर भागातील नवरात्रोत्सव यंदा स्थगित करण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला आहे. संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार प्रताप सरनाईक आणि संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार रवींद्र फाटक यांनीही यंदा आपण नवरात्रोत्सव थाटात साजरा करणार नसून त्याऐवजी सामाजिक उपक्रम आयोजिणार असल्याचे सांगितले.
नवरात्रोत्सव साजरा करण्याची इच्छा आहे. मात्र, शासकीय नियम पाहता यंदा दांडिया किंवा गरबा-रास तर आयोजिणार नाही. त्याऐवजी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने इतर सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम आयोजिणार आहोत.
आ. रवींद्र फाटक, अध्यक्ष, संकल्प प्रतिष्ठान
दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करतो. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उत्सव साजरा करणार नाही. उलट त्यासाठी जो खर्च होतो त्याच रकमेतून एक लाख मास्क आणि सॅनिटायझरवाटप करण्याचे आम्ही ठरवले आहे. विविध आरोग्यविषयक उपक्रमही आम्ही राबवतो आहोतच.
- आ. प्रताप सरनाईक,
अध्यक्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान