केडीएमसी हद्दीत एकही ग्रीन बिल्डिंग नाही; प्रशासनाची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:02 AM2019-08-07T02:02:04+5:302019-08-07T02:02:11+5:30
ग्रीन बिल्डिंगचे निकष पाळणाऱ्यांना रेटिंग करून घेण्याचे आवाहन
कल्याण : रेन वॉटर हार्वेस्टींग, विजेची बचत, सोलार पॅनल आणि ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे अशा बाबींची अंमलबजावणी करणाºया ग्रीन बिल्डिंग उभ्या करण्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या गृह कौन्सिलच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख नम्रता रणदिवे यांनी केले. मात्र त्याचवेळी कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरात ग्रीन बिल्डींगचे निकष पाळणारी एकही इमारत नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
डोंबिवली शहरातील ‘साकेत’ इमारतीमध्ये हे निकष पाळले आहेत. मात्र त्या इमारतीचे ग्रीन बिल्डींगसाठी गृह कौन्सिलकडून रेटिंग करून घेतलेले नाही, असे स्पष्ट झाले. ग्रीन बिल्डिंगसाठी रेटिंग देणाºया केंद्र सरकारच्या गृह कौन्सिल व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ग्रीन बिल्डिंग जनजागृती सेमीनारचे अत्रे रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके, एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे आदी मान्यवर तसेच बिल्डर आणि वास्तुविशारद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणदिवे यांनी प्रारंभी ग्रीन बिल्डिंगबाबत प्रेझेंटेन्शन दिले. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रायलयाने ग्रीन बिल्डींगला चालना देण्यासाठी तीन प्रकारची रेटिंग पद्धती निर्माण केली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेने ग्रीन बिल्डिंगसाठी पुढाकार घेतला आहे. ग्रीन बिल्डींग रेटिंग करण्यासाठी पुढाकार घेतल्यास बिल्डरांना एफएसआय आणि अन्य काही गोष्टीत सूट दिली जाते. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांनी ग्रीन बिल्डिंगची संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन त्यांनी केले.
रणदिवे म्हणाल्या की, भारतात यापूर्वी मातीची घरे होती. आता सिमेंट काँक्रिटचे जंगल वाढले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. २००८ पासून सरकारने रेन वॉटर हार्वेस्टींग सक्तीचे केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टींग, विजेची बचत, सोलार पॅनल आणि ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे या गोष्टींची अंमलबजावणी बिल्डिंगमध्ये होत असल्यास त्याला प्रत्येक कामानुसार गुण दिले जातात. ग्रीन बिल्डिंगचे रेटिंग या पद्धतीने होते. ग्रीन बिल्डिंग ही ओळख प्राप्त करून घेण्याकरिता वरील उपाययोजना करताना सुरुवातीला खर्चिक वाटत असल्या तरी त्या दीर्घकालीन परिणाकारक आणि किफायतशीर आहेत. शहरात ग्रीन बिल्डिंग उभारण्यासाठी बिल्डरांनी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
पर्यावरण धोरणाचा मसुदा मंजुरीच्या प्रतीक्षेत
कल्याण-डोंबिवलीत ग्रीन बिल्डिंग तयार झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा शहर अभियंता कोळी-देवनपल्ली यांनी व्यक्त केली. रेटिंग घेतलेली कल्याण डोंबिवलीत एकही ग्रीन बिल्डिंग नाही. एक साकेत इमारत आहे. त्यांनी ग्रीन बिल्डींगचे निकष पाळले आहेत. मात्र त्यांचे रेटिंग झालेले नाही, अशी कबुली कोळी यांनी दिली. महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे. त्यामध्ये ग्रीन बिल्डींग किती आहेत. याची तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारने पर्यावरण विषयक धोरणाचा मसूदा २०१८ मध्ये तयार केला आहे. त्याला अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. हा मसुदा ग्रीन बिल्डींगसाठी पूरक आहे. महापालिका हद्दीत पुराचा मोठा फटका बसला. त्यासाठीही ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्या म्हणाल्या.