ठाण्यात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:18+5:302021-09-02T05:26:18+5:30
ठाणो : ठाण्यात मागील ११ वर्षे फेरीवाला धोरणाची रखडपट्टी सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या शेवटी या धोरणाला काहीशी ...
ठाणो : ठाण्यात मागील ११ वर्षे फेरीवाला धोरणाची रखडपट्टी सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या शेवटी या धोरणाला काहीशी चालना मिळाली होती. फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊन त्यांना व्यवसायासाठी हक्काच्या जागा देण्यात येणार होत्या. त्यानुसार २७८ फेरीवाल्यांचे ओळखपत्र तयार केली, त्यांचे वाटपही करण्याचे प्रशासनाने निश्चित केले होते. परंतु, ते अद्याप झालेले नाही. त्यातही वर्षभरात फेरीवाला समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यातही समितीमधील काही सदस्यांचे ठाण्यातील फेरीवाल्यांचा समावेश करण्याबाबत एकमत आहे, तर काहींचे इतर ठिकाणच्या फेरीवाल्यांचाही समावेश करावा असे मत असल्याने, त्यामुळे हे धोरण लांबणीवर पडले आहे.
ठाणे महापालिका परिसरात किमान १० हजारपेक्षा जास्त फेरीवाले असल्याचे सांगण्यात येत असले तरी पालिकेच्या सर्व्हेत अवघे पाच हजार १४१ फेरीवाले असल्याचे नमूद आहे. त्यांच्यापैकी तीन हजार ८०० फेरीवाल्यांसाठी पहिल्या टप्प्यात १०४ ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना मागील वर्षीच्या सुरुवातीला ओळखपत्रे दिली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे अंमलबजावणी रखडल्याने त्यांना जागावाटप केलेले नाही.
फेरीवाला धोरण राबविण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने वेळोवेळी निर्णय घेतले. मात्र, त्याची अंमलबजावणी संथगतीने सुरू आहे. त्यात ज्या पाच हजार १४१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे, त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना नोंदणी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय दीड वर्षापूर्वी घेऊन त्यातील सुमारे एक हजार ८०० फेरीवाल्यांना या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र मिळविता आले. त्यातही नौपाडा, कोपरी आणि लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितींतर्गत असलेल्या २७८ फेरीवाल्यांचे ओळखपत्र अंतिम झालेले आहे.