पाणीकपातीमध्ये आणखी वाढ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:26 AM2019-05-28T00:26:44+5:302019-05-28T02:49:21+5:30
पाऊस थोडासा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने पाणीकपात आणखी वाढणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ठाणे महापालिकेने पाणीकपात ३० तासांचीच असेल व त्यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा लाभला आहे.
ठाणे : पाऊस थोडासा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने पाणीकपात आणखी वाढणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ठाणे महापालिकेने पाणीकपात ३० तासांचीच असेल व त्यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा लाभला आहे. कमी पडलेल्या पावसामुळे ठाणे पालिका हद्दीत नागरिकांना मोठ्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. परंतु यंदा योग्य नियोजनामुळे पाणीकपातीचा सामना तूर्तास तरी करावा लागणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मागील वर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झाला. काही महापालिकांनी जादा पाणीउपसा केल्याने तो वेगाने खाली आला. जुलै महिन्यापर्यंत तो पुरावा यादृष्टीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. परिणामी, इतर वापरासाठी विहिरी, कूपनलिका यांचे पाणी वापरण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला बुधवार आणि शुक्र वार असे दोन दिवस ३० तासांची पाणीकपात करण्यात येते. यामध्ये बुधवारी टेमघर येथून होणारा पाणीपुरवठा बंद असतो. तर, शुक्र वारी स्टेम, एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद असतो. दरम्यान, सध्याची धरणाची पातळी पाहता उन्हाळ््यात बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यातच, हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा विचार करता पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.