नगरविकास खात्यात आणि कामात मातोश्रीवरुन कोणताही हस्तक्षेप नाही: एकनाथ शिंदे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 01:58 PM2021-08-22T13:58:18+5:302021-08-22T14:01:06+5:30
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असून ते केवळ सहयांचेच मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकास खात्यात किंवा आपल्या कामामध्ये मातोश्रीवरुन कोणताही हस्तक्षेप होत नसल्याचा निर्वाळा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असून ते केवळ सहयांचेच मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकास खात्यात किंवा आपल्या कामामध्ये मातोश्रीवरुन कोणताही हस्तक्षेप होत नसल्याचा निर्वाळा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला आहे. समाजमाध्यमांद्वारे त्यांनी आपली ही प्रतिक्रीया व्यक्ती केली आहे.
केंद्रीय मंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर नारायण राणे यांची सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. याच दरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असल्याचा आरोप करीत त्यांना आपण भाजपमध्ये घ्यायला तयार असल्याचेही राणे यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मातोश्रीवरुन अर्थात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या हस्तक्षेपाचा आरोप फेटाळून लावला. परंतू, धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी नगरविकासच नाही तर कोणत्याही खात्याचा निर्णय हा मुख्यमंत्री यांच्याच संमतीने मंत्रीमंडळाला घ्यावा लागतो. याची युतीच्याच काळात स्वत: मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांनाही जाणीव असल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला. अगदी आताही केंद्रात मंत्री असतांनाही धोरणात्मक निर्णय घेतांना राणे यांनाही पंतप्रधांनांचीच संमती घेऊनच तो घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारेच आहे.
* आपल्या विभागात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शिवाय, हिंदूहह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही यशस्वीपणे आपण पुढे नेत आहोत. त्यामुळेच आपल्या कामात, विभागात मातोश्रीचे किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. यात तथ्य नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करण्याचे काम झाले आहे. कोविड काळात आणि आताही सर्व प्रकारच्या विकास कामात कुठेही मुख्यमंत्र्यांनी कात्री लावलेली नाही. अनेक विकास प्रकल्प महाविकास आघाडी पुढे नेत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी चांगले काम करीत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.