सातबारा उता-यासाठी आता तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 03:15 PM2017-08-15T15:15:08+5:302017-08-15T15:15:29+5:30
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर बसवण्यात आलेल्या ऑनलाईन सातबारा किऑस्क मशीनचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला
ठाणे, दि. 15 -स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर बसवण्यात आलेल्या ऑनलाईन सातबारा किऑस्क मशीनचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. त्याद्वारे पहिल्या टप्यात जिल्ह्यातील 101 गावांच्या सातबा-याचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे शेतक-यांना ते आता ऑनलाईन मिळवता येणार आहे. त्यासाठी शेतक-यांना आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. गावात बसवलेल्या मशीनद्वारे सातबारा उतारा घेता येणार आहे.
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 101गावांचा सात बारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. जिल्ह्यातील 1001 गावांपैकी पहिल्या टप्प्यात 101 गावांचे संगणकीकरणाचे कामपूर्ण झाली आहे. सातबारा संगणकीकरणात उल्हासनगर तालुका आघाडीवर आहे. या 101 गावांत सात बाराचे किऑस्क मशीन डिजिटल स्वाक्षरीसह नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सीएसआरच्या माध्यमातून आजपासून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयांमध्ये ही मशीन्स बसवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आता या मशीनमुळे राज्यातील ऑनलाईन नेटवर्कमधील कुठलाही सात बारा काढणे शक्य होणार आहे. आता सातबा-यासाठी तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यात एकंदर 44 ठिकाणी ही मशीन्स बसवण्यास सुरुवात होणार आहे. या ऑनलाईन सातबारा शुभारंभ प्रसंगी आजच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते