दु:खात आम्हाला कोणीच वाली नाही; डोंबिवलीत पूरग्रस्तांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:33 AM2019-08-07T02:33:27+5:302019-08-07T02:33:32+5:30
प्रशासनाची डोळेझाक होत असल्याची टीका
डोंबिवली : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस व आलेल्या पुरामुळे खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. डोंबिवली रिंगरूटच्या आराखड्यात असलेला परिसर पाण्याखाली होता. त्यात रविवारी बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने खाडीकिनारी भागात पूरसदृश परिस्थिती होती. पुराचा फटका बसलेल्या पश्चिमेतील नवीन देवीचा पाडा येथील रहिवाशांंनी मंगळवारी रस्त्यावर येत आम्हाला कोणी वाली नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.
सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी किंमत घरे मिळाल्याने अनेकांनी ती खरेदी केली. खाडीकिनारी असलेल्या नवीन देवीचा पाडा, जगदंबा मंदिर, गरिबाचा वाडा, सरोवर नगर, जुनी डोंबिवली, कुंभारखाण पाडा परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचले. त्यातच बारवी धरणाचे पाणी वाढल्याने अनेकांच्या घरातील फर्निचर, टी. व्ही., गाद्या, कपडे, धान्य असे सर्व साहित्य भिजले. त्यामुळे नागरिकांनी सर्व सामान बाहेर टाकून दिले. सध्या तेथील पाणी ओसरले असले तरी घरांत चिखलाचे साम्राज्य आहेत. त्यामुळे आता राहायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
निवडणुकीत आमच्याकडे हक्काचे मतदार म्हणून पाहिले जात होते. त्यावेळी अनेक जण आमची विचारपूस करत होते. परंतु, आता कोणी काळजी घेत नाही, अशी खंत रहिवासी व्यक्त करत आहेत. सरकारही आमच्या समस्येकडे कानाडोळा करत आहेत. आम्ही उद्ध्वस्त झालो आहेत. आम्हाला कोणीच वाली नाही, अशी टीका ते करत आहेत. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कायदा मोडून बांधकामे केली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही रहिवासी करत आहेत.
प्रत्यक्षात पश्चिमेतील बहुतांश ठिकाणच्या पूरग्रस्तांची स्थानिक नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, भाजपचे गटनेते नगरसेवक विकास म्हात्रे, महापालिका विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, नगरसेवक वामन म्हात्रे आदींनी आपापल्या प्रभागांत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. परंतु, ही सुविधा तोकडी असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने ठोस पावले उचलावीत, असे मत रहिवासी व्यक्त करत आहेत.
चाळींमधील घरात चिखल झाला असून, त्याची स्वच्छता करणे, फवारणी करणे, साथीचे आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून वैद्यकीय आरोग्य शिबिरे भरवण्याची गरज व्यक्त होत आहे.
म्हशी गेल्या पण शेणामुळे दुर्गंधी
कल्याण येथील गोविंदवाडी बायपास रस्त्यावर परिसरातील गोठ्यांमधील म्हशी सुरक्षिततचेच्या कारणास्तव निवाºयासाठी आणल्या होत्या. पूरस्थिती कमी होताच त्यांना पुन्हा गोठ्यांमध्ये नेण्यात आले. परंतु, त्यामुळे मात्र त्या रस्त्यावर प्रचंड घाण झाली होती.
शेण-मूत्र आदींमुळे दुर्गंधी पसरलेली होती. वाहनचालक, पादचारी, रहिवासी आदींच्या आरोग्याचा त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यासंदर्भात महापालिकेचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी म्हणाले की, तेथेही स्वच्छता केली जाईल. बहुतांशी काम झाले आहेत, उर्वरित पूर्ण केले जाणार आहे.
पूरग्रस्त घरातील खराब झालेल्या वस्तू रस्त्यावर आणून टाकत आहेत. ते उचलण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. तसेच जंतुनाशक पावडर फवारणी, धुरफवारणी अशीही कामेही केली जात आहेत.
- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी.