तालुक्यातील शासकीय रुग्णालयात एकही बालरोगतज्ज्ञ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:10 AM2019-02-23T01:10:41+5:302019-02-23T01:11:02+5:30

भयाण वास्तव : कुपोषणग्रस्त बालकांची होते परवड

There is no pediatrician in government hospital in taluka | तालुक्यातील शासकीय रुग्णालयात एकही बालरोगतज्ज्ञ नाही

तालुक्यातील शासकीय रुग्णालयात एकही बालरोगतज्ज्ञ नाही

Next

जनार्दन भेरे

भातसानगर: शहापूर तालुक्यात नऊ आरोग्य केंद्रे, एक ग्रामीण रुग्णालय आणि एक उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र, कोणत्याही आरोग्य केंद्रात वा रुग्णालयात एकही बालरोगतज्ज्ञ नाही. शिवाय, ज्या ठिकाणी हे पद भरण्यात आले आहे, तेथे तो काम न करता दुसरीकडेच काम करत असल्याची माहिती उजेडात आली आहे. तालुक्यातील अंबरपाडा येथील नीरज तानाजी विशे या अतितीव्र कुपोषित मुलावर योग्य उपचार व्हावेत, त्याचे वजन वाढावे, यासाठी शहापुरातील उपजिल्हा रुग्णालयातील कुपोषित मुलांच्या रोगनिदान व उपचार केंद्रात त्याला दाखल केले. मात्र, तीन दिवसांच्या उपचारांनंतर या मुलाचे वजन वाढण्याऐवजी उलट ते कमी झाल्याने या मुलाचे पालक मात्र निराश झाले आहेत. याप्रकरणी चौकशी करताना येथे बालरोगतज्ज्ञ नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहापूर हा आदिवासी तालुका. येथे अजूनही कुपोषणाने ग्रस्त मुले आहेत. त्यासोबतच इतर आजारांनी त्रस्त मुलांची काळजी घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरची गरज आहे. कुपोषित बालकांचे वजन वाढावे, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, ही जबाबदारी केवळ महिला बालविकास विभागाची नाही. तर, कुपोषित मुलांवर उपचार करणे गरजेचे असून त्यासाठी बालरोगतज्ज्ञांची आवश्यकता आहे.
कसारा, टेंभा, डोळखांब, अघई, किन्हवली, शेंद्रुण, शेणवा, टाकीपठार, वासिंद या नऊ उपकेंद्रांबरोबर खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालय, यापैकी खर्डी आणि उपजिल्हा रु ग्णालय, शहापूर येथे बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. पण, उपजिल्हा रुग्णालयातील पद अनेक महिन्यांपासून रिक्तच आहे. खर्डी येथे तस्लीम शेख या बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात काम करत असल्याची माहिती उजेडात आली आहे. खर्डी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत म्हासाळ यांना विचारले असता, त्यांनी या डॉक्टर ठाणे येथे काम करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तालुक्यातील एकमेव उपजिल्हा रुग्णालयात दररोज अनेक लहान मुले तसेच गर्भवती तपासणी आणि उपचारासाठी येतात. मात्र, बालरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात सुरू केलेल्या कुपोषितांच्या कक्षात कायमस्वरूपी सफाई कामगाराची आवश्यकता असतानाही तेथे कुणीच नसल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेक दिवसांचे सलाइन तोच स्टॅण्डला दिसत आहेत. त्यामुळे हे पददेखील भरण्याची मागणी होत आहे.

कुपोषितांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना सकस आहार देण्याचे काम एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अखत्यारित येत आहे. तालुक्यात खर्डी आणि उपजिल्हा रुग्णालय, अशा दोन ठिकाणी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत, मात्र ती भरणे गरजेचे आहे.
- डॉ. अंजली चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर

Web Title: There is no pediatrician in government hospital in taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.