ठाणे-कल्याण समांतर रस्त्याचा प्रस्तावच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:26 AM2020-07-26T03:26:49+5:302020-07-26T03:27:05+5:30
जिल्हा प्रशासनाचे कानांवर हात : रेतीमाफियांच्या विरोधापुढे टाकली नांगी
सुरेश लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : १५ वर्षांपूर्वी म्हणजे २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर ठाणे-कल्याण रेल्वेलाइनला समांतर रस्ता मंजूर झाला होता. परंतु, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाने तर असा काही प्रस्ताव आल्याचे ऐकिवातही नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा रस्ता बांधण्याची केवळ घोषणा केली गेली की, त्यांचे विस्मरण झाले, अशी चर्चा आहे. तर, भूमाफिया, रेतीमाफियांच्या विरोधामुळेच प्रशासन आणि राज्यकर्ते समांतर रस्त्याविषयी उदासीन असल्याचा आरोप दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील ताण या समांतर रस्त्यामुळे कमी होणार होते. तर, रेल्वेतील प्रवाशांना अडचणीच्या वेळी या रस्त्याने येजा करणे शक्य होणार होते. रेल्वेच्या संभाव्य अपघातप्रसंगी या समांतर रस्त्याने मदतीची वाहने रेल्वे अपघातस्थळी आणता यावी, अशा हेतूने समांतर रस्ता मंजूर झाला होता. तो नसल्याने १५ वर्षांपूर्वी पाण्यातून वाट काढत रेल्वेरुळांवरून चालण्याचा वाईट अनुभव महिला प्रवाशांनीही घेतला होता. या जीवघेण्या महाप्रलयाच्या वाईट अनुभवानंतर हा रेल्वेलाइनला समांतर रस्ता मंजूर झाला होता. काही कालावधीनंतर जिल्हा नियोजन व विकास समितीमध्ये हा विषय चर्चेला येऊन या रस्त्याला मान्यता मिळालेली होती. मात्र, या रस्त्याच्या कामाविषयी सध्या जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाने कानावर हात ठेवले आहेत.
भूसंपादनाच्या हालचालीच नाही
या १८ किमीच्या समांतर रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नाही. मध्यंतरी ठाकुर्ली ते पत्रीपुलापर्यंत रस्ता तयार झालेला आहे. याप्रमाणेच ठाकुर्ली ते डोंबिवली हा चार किमीचा रस्ता स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे रखडलेला आहे. त्यानंतर, पुढे ठाण्याच्या दिशेने तर काहीच झालेले नाही.
एकमेकांकडे बोट
ठाणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आजपर्यंत या समांतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव आलेला नाही. असा रस्ता प्रस्तावित नसल्याचे ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी सांगितले. तर, बांधकाम विभागाच्या नियंत्रणात हा समांतर रस्ता असल्याचा प्रस्ताव नाही. कदाचित एमएसआरडीसी, एमएमआरडीए किंवा ठाणे महापालिकेकडे तो प्रस्तावित असण्याची शक्यता येथील बांधकाम विभागाचे ज्येष्ठ अभियंता रणजित शिंगाडे यांनी सांगितले.
भू आणि रेतीमाफियांना अभय
ठाणे पूर्वेतील कोळीवाडा येथील रेल्वे पुलाजवळून हा समांतर रस्ता ठाणे खाडी पार करून पुढे विटावा ब्रिज, वाशीकडे जाणाºया लोकलचा ट्रॅक ओलांडून पुढे नेणे अपेक्षित होते. कळवा स्टेशनजवळील मफतलाल कंपनीच्या कॉलनीजवळून गेलेल्या रस्त्याला तो जोडला जाऊ शकतो. पुढे खारेगाव फाटकाला लागून असलेल्या पश्चिमेच्या कळवा कारशेडजवळून तो पुढे नेणे शक्य आहे. अभिनेत्री नूतनच्या बंगल्याच्या डोंगराला वळसा घालून मुंब्रा रेतीबंदरकडून तो मुंब्रा स्टेशन, खाडी ओलांडून दिवा स्टेशन, कोपरपर्यंत करणे शक्य होते. परंतु, या कोपर खाडी, दिवा खाडी आणि मुंब्रा खाडीत माफियांकडून होणारे भराव आणि मनमानी रेतीउत्खनन करणाऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्या हितरक्षणार्थ समांतर रस्त्याचा प्रकल्प धूळखात ठेवण्यातच राज्यकर्त्यांनी धन्यता मानली.
खाड्यांमधील रेती सक्शनपंपाद्वारे काढली जाते. या खाड्यांकडे जाण्यास रस्ता नसल्याने येथील भूमाफिया, रेतीमाफियांना पकडता येत नसल्याचा बहाणा पोलीस व प्रशासनाला करता येतो. समांतर रस्त्याच्या निर्मितीमुळे प्रशासनाला हा बहाणा करता येणार नाही, असे येथील जाणकार सांगत आहेत. या रेल्वेलाइनच्या आधीच्या चौथ्या ट्रॅकला लागून पाचवा व सहावा रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी गेल्या आठ वर्षांच्या दरम्यान दिवा ते ठाण्यापर्यंत रेल्वेने खाडीतील व नागरी वस्तीतील अतिक्रमणे तोडली.
रेल्वेच्या या दोन ट्रॅकच्या विस्तारीकरणासाठी या परिसरात भूसंपादन करून कम्पाउंड घातले. परंतु, या ट्रॅकऐवजी समांतर रस्त्यासाठी या जागेचे भूसंपादन होत असल्याचा नागरिकांचा समज होता. मुंब्रा येथील दोन फलाट व कळवा येथील नवीन फलाट हे लोकलसाठी असल्याचे या समांतर रस्त्याच्या चाचपणीप्रसंगी लक्षात आले. यासाठी पाचव्या व सहाव्या ट्रॅकच्या विस्तारासाठी खाडीकिनाºयाचे कांदळवन नष्ट झाले आहे. मात्र, ठाणे ते कल्याण रेल्वेलाइनच्या समांतर या १८ किमीच्या रस्त्यासाठी १५ वर्षांत हालचाली केल्या नसल्यामुळे तो तयार झाला नाही.