पाऊस नाही, मजुरी नाही; मग पोटाकरिता गाठतो मुंबई

By admin | Published: April 15, 2016 01:25 AM2016-04-15T01:25:25+5:302016-04-15T01:25:25+5:30

गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच.

There is no rain, no wages; Then Mumbai gets to the stomach | पाऊस नाही, मजुरी नाही; मग पोटाकरिता गाठतो मुंबई

पाऊस नाही, मजुरी नाही; मग पोटाकरिता गाठतो मुंबई

Next

- स्रेहा पावसकर,  ठाणे
गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच. त्याच्या आधारावर घरखर्च, मुलांचे शिक्षण कसे होणार, कर्ज कसे फिटणार? आणि बचत ती काय होणार? दिवाळीनंतर तर हाताला कामच नाही? निव्वळ बसून करायचे काय? अशा असंख्य समस्यांचा सामना करीत असलेल्यांनी पोटाची वितभर खळगी भरण्याकरिता ठाण्यातील रामनगर परिसरातील मदत छावणीत आसरा घेतला आहे. नांदेड, लातूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांनी आपल्या व्यथा भरभरून सांगितल्या.
नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सुमारे २०० दुष्काळग्रस्त सध्या या छावणीत वास्तव्याला आहेत. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आठ दिवसांतून एकदा टँकर येतो, पण तोही गावात. रानमाळावर राहणाऱ्या लोकांपर्यंत टँकरचे पाणी पोहोचतच नाही. पाण्याअभावी शेती करपून गेली. याही परिस्थितीत कुणी शेती केलीच तरी पिकं चांगली येत नाही. पाणी विकत घ्यायचे म्हटले तर २ रुपये १ घागर असा सध्या भाव सुरू असल्याचे बाराळी गावातील दुष्काळग्रस्त बजरंग चव्हाण यांनी सांगितले. ज्यांच्याकडे बोअरने थोडेफार पाणी येते. अशांच्या शेतात मजुरी करायची म्हटले तरी ती रोज मिळत नाही. त्यामुळे घरातील वयोवृद्ध आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांना मागे ठेवून रोजगारासाठी आम्ही मुंबई गाठतो. इथे इमारत बांधकाम, पेव्हरब्लॉक बसवणे, कचरा साफ करणे अशाप्रकारे २०० ते ३०० रुपये रोजंदारीवर काम केल्यावर अन्नधान्याचा खर्च वगळता उरलेले पैसे गावी पाठवतो, असे अनेकांनी सांगितले. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे आल्यावर ३-४ महिने रोजंदारी करतो आणि पाऊस आल्यावर पुन्हा गावाकडे जातो. काहींनी दरवर्षी येणेजाणे टाळण्याकरिता मुंबईतच संसार थाटला, असे गुजाबाई चव्हाण यांनी सांगितले. छावणीत असलेल्यांपैकी काही प्रथमच मुंबईत आले असले तरी अनेकजण सलग २-३ वर्षे याच काळात येत आहेत. त्यामुळे बदलत्या ऋतुचक्राप्रमाणे त्यांचेही स्थलांतर सुरू आहे.
यंदा प्रसिद्धिमाध्यमातून मुखेड तालुक्याची परिस्थिती समजल्यावर आमच्या गावात असलेल्या माणसांना दोन-तीन दिवसाआड का होईना, पण टँंकरचे पाणी मिळू लागल्याचेही त्यांनी सांगितले. मुलांचे
शिक्षण असल्यामुळे त्यांना तेथेच सोडून येतो. त्यांनी भरपूर शिकून चांगली नोकरी करावी. त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नकार्यासाठी जास्तीतजास्त पैसे बचत करावेसे वाटतात, असे सुशीलाबाई राठोड यांनी सांगितले.

जनावरे दिली सोयऱ्यांकडे
माणसांना पिण्यासाठी पाणी नाही. अशावेळी जनावरांसाठी पाणी,चारा मिळवणे कठीण असते. त्यातच आता रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबईला आल्यावर जनावरांना नातेवाइकांच्या घरी त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय करून आलो आहोत, असेही येथील लोकांनी सांगितले.

सामाजिक संस्था, नागरिकही सरसावले
मुंबईत आणि नंतर ठाण्यात स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बातचीत केली. विदर्भ समाज संघ, शेअर सामाजिक संस्था, भोजा एज्युकेशनल आणि सोशल ट्रस्ट यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने तर कोणी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर, काही सर्वसामान्य ठाणेकरांनी या छावणीमध्ये उत्स्फूर्तपणे धान्य,कपड्यांचे वाटपही केले.

Web Title: There is no rain, no wages; Then Mumbai gets to the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.