संमेलनाबाबत कोमसापचे अद्याप तळ्यातमळ्यात
By Admin | Published: September 29, 2016 03:47 AM2016-09-29T03:47:19+5:302016-09-29T03:47:19+5:30
डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोमसापचा प्रांत असलेल्या
- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोमसापचा प्रांत असलेल्या ठाणे जिल्ह्यात हे संमेलन होत असल्याने कोमसापने त्याला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
मात्र, केंद्रीय शाखेकडून पाठिंब्याबाबत अद्याप भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही, अशी माहिती कोमसापच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी दिली.
कोमसाप कोकणात विविध ठिकाणी विभागीय साहित्य संमेलने आयोजित करते. विभागीय साहित्य संमेलने ही साहित्याच्या वाढीस पूरक असल्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे या संमेलनात कोमसाप सहभागी होणार का, असे विचारता मनीष पाटील म्हणाले, डोंबिवलीत साहित्य संमेलन होत आहे. त्याचा मला आनंद आहे. डोंबिवलीच्या शाखेने त्याचे स्वागतच केले आहे. या संमेलनास माझा व्यक्तिगत पाठिंबा आहे. मात्र, शाखेचा पाठिंबा मला जाहीर करता येत नाही. कोमसापच्या केंद्रीय शाखेची भूमिका ठरली की, पाठिंब्याची घोषणा केली जाईल.
पत्रलेखकांनाही स्थान हवे
डोंबिवली साहित्य सभेने साहित्य संमेलनास पाठिंबा दिला आहे. साहित्य सभेचे अध्यक्ष तात्याबा शेपाळे म्हणाले, पायाने अधू असलो, तरी मला साहित्य संमेलनासाठी काम करण्याची इच्छा आहे. मी काही मोठा लेखक नाही. पण, पत्रलेखन करतो. पत्रलेखकांनाही संमेलनात स्थान असावे. ९० वर्षांनी साहित्य व सांस्कृतिकनगरी असलेल्या डोंबिवलीला संमेलनाचा मान मिळतो आहे, ही आनंदाची बाब आहे. संमेलनासाठी वर्गणी गोळा करणे, माहिती पोहोचवण्याची कामे करण्याची इच्छा शेपाळे यांनी व्यक्त केली. शेपाळे यांचे गोकूळ मित्र मंडळ आहे. या मित्र मंडळाचे कार्यकर्ते संमेलनात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार असल्याचे शेपाळे यांनी सुचवले.