ग्रामीण भागातील एसटीला प्रतिसादच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:12+5:302021-07-20T04:27:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. एसटीच्या ठाणे विभागानेदेखील ग्रामीण भागातील सेवा सुरू केली आहे. मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. रोजच्या रोज वाडा, शहापूर, मुरबाड आदी भागात प्रत्येकी १५ च्या आसपास बस धावत आहेत. परंतु, ग्रामीण भागात शाळा बंद असल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाने ‘गाव तिथे एसटी’ अशी सेवा सुरू केली होती; मात्र, कोरोनामुळे शहरातच एसटी धावत असल्याचे चित्र दिसून आले आहे. ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बंदच ठेवली होती. पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लाटेतही ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बंदच होती. त्यामुळे येथील नागरिकांना तारेवरची कसरत करून डुगडुगी, टमटम, रिक्षाची मदत घेऊन इच्छित स्थळ गाठावे लागत होते. आता कुठे मागील आठडय़ापासून ग्रामीण भागात एसटी सोडल्या जाऊ लागल्या आहेत. परंतु, यातही अत्यावश्यक सेवेसाठीच त्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. १०० टक्के बस नाहीत. परंतु, ज्या लोकांना जाण्यासाठी सोय नाही, अशा कुठल्याही बस आता बंद नसल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार मुरबाड, शहापूर, वाडा आदी ग्रामीण भागात बस सुरू केलेल्या आहेत. परंतु, या मार्गावर काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. यातील प्रत्येक मार्गावर दिवसाला प्रत्येकी १५ बस धावत आहेत.
आगारातील एकूण बसेस - ५५०
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १०० टक्के फेऱ्या होत होत्या
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ५० टक्के
खेडेगावात जाण्यासाठी ‘टमटम’चा आधार
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी आता कुठे सुरू झाली असली, तरी त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. या बस मुरबाड, वाडा आणि शहापूर या मार्गांवर धावत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या भागातील बस बंद होत्या. त्यामुळे येथील नागरिकांना टमटम किंवा डुगडुगीचा आधार घ्यावा लागल्याचे दिसून आले आहे.
४१ हजार कि.मी.चा प्रवास, पण फक्त शहरांचाच!
दुसरी लाट ओसरल्यानंतर ठाणे आगारातून ३५० च्या आसपास बस रस्त्यावर उतरविल्या आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी, राज्याअंतर्गत, रातराणी बसेस सुरू आहेत. परंतु त्यांचा प्रवास हा रोजच्या रोज सुमारे ४१ हजार किमीचाच होत आहे. त्यातही याला प्रतिसाद मात्र आजही ५१ टक्क्याच्या आसपास असून, उत्पन्नदेखील ३० ते ३५ लाखांच्याच घरात आहे.
.....
कोरोनामुळे आम्हाला कुठे जाणे शक्य होत नाही. परंतु, कोरोनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेत आम्हाला डुगडुगी किंवा टमटमचाच आधार होता. एसटी बंद असल्याने कुठे जायचे झाल्यास याच खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
(संजय पाटील, मुरबाड)
....
आता बस सुरू झाल्या असल्या, तरी त्याचे नियोजन अद्यापही दिसून येत नाही. बसचे प्रमाण ग्रामीण भागात कमी आहे. त्यामुळे टमटम किंवा रिक्षानेच इच्छित स्थळ गाठावे लागत आहे. (किरण राऊत-खडवली)
....
शहरी भागासह ग्रामीण भागातही आता बस सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि वाडा या मार्गावर बस सुरू झाल्या आहेत. परंतु, त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नाही. शाळादेखील बंद असल्याने त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
(विनोदकुमार भालेराव - विभागीय नियंत्रक, ठाणे)