जि.प.च्या स्वीकृत सदस्यांमध्ये माध्यमिकचा एकही शिक्षक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:32 AM2018-12-29T02:32:37+5:302018-12-29T02:32:47+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षकांचीच निवड करण्यात आली आहे. मात्र, यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटला आहे.
भातसानगर : ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षकांचीच निवड करण्यात आली आहे. मात्र, यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटला आहे.
जिल्हा परिषदेत सध्या शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आहे. यामध्ये शिक्षक संघटनेच्या दोन सदस्यांची निवड ही शिक्षण समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेले सदस्य करतात. या निवडीत एक प्राथमिक तर एक माध्यमिक, अशा दोन सदस्यांची निवड होणे आवश्यक असल्याचे मत माध्यमिक शिक्षक व्यक्त करतात. मात्र, तसे न होता निवड झालेले दोन्ही सदस्य हे प्राथमिक विभागाचेच असल्याने माध्यमिक शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
यामुळे शिक्षकांमध्ये दोन गट पडत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून यासाठी संघटना दाद मागणार असल्याचे समजते. वास्तविक, सदस्यांनी तेव्हाच विचारणा करायला हवी होती. सध्या शहापूर तालुक्याचे दोन सदस्य जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून निवडले आहेत.
आम्ही शासकीय आदेशानुसार स्वीकृत सदस्यांमध्ये दोन प्राथमिक शिक्षकांची निवड केली आहे. जर माध्यमिकचा शिक्षक घ्यायचा आदेश आला, तर त्यांचाही समावेश यात नक्की करू. - मंजूषा जाधव,
जिल्हा परिषद अध्यक्षा
स्वीकृत सदस्यांमध्ये एक प्राथमिक, तर एक माध्यमिक वा उच्च माध्यमिक शिक्षकांमधून निवड करणे गरजेचे होते. मात्र, तसे न होणे हा माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांवर अन्याय आहे. - विजय घोडविंदे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा विनाअनुदानित संघटना