आयत्या वेळेच्या ८१ विषयांचा थांगपत्ता नाही
By admin | Published: May 25, 2017 12:01 AM2017-05-25T00:01:56+5:302017-05-25T00:01:56+5:30
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावाखेरीज मंजूर केलेल्या इतर प्रस्तावांवर देखील आता सरकारचे बारीक लक्ष राहणार आहे.
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावाखेरीज मंजूर केलेल्या इतर प्रस्तावांवर देखील आता सरकारचे बारीक लक्ष राहणार आहे. राज्यातील सरकारची पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेना सातत्याने कोंडी करत असल्याने ठामपात संपूर्ण बहुमत प्राप्त केलेल्या शिवसेनेला शह देण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. भाईंदरपाडा ये तो सिर्फ झाकी है, असे मत एका भाजपा नेत्याने व्यक्त केले.
ठाणे : महासभेत शनिवारी आयत्या वेळेस आणलेल्या तब्बल ८१ विषयांना मंजुरी देण्यात आली असली तरी हे प्रस्ताव कोणते आहेत याची माहिती महापौर अथवा उपमहापौर कार्यालयासही नाही. त्यामुळे या प्रस्तावांबाबतचे गूढ वाढले आहे. गोखले रोडसह ठाण्यातील पाच रस्त्यांवरील व्यापारी व इमारतींची अतिक्रमणे पाडून टाकण्याचा विषय आयत्या वेळीचा विषय म्हणून प्रशासनाने मांडून मंजूर करवून घेतला होता. मात्र इतकेच गंभीर व दूरगामी परिणाम करणारे विषय जर अशा पद्धतीने आयत्या वेळचे विषय म्हणून आणले जाणार असतील तर ही बाब धक्कादायक असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे.महासभेसमोर असलेल्या भाईंदरपाडा येथील मैदान देखभालीकरिता विकासकाला देण्याच्या निर्णयामुळे सत्ताधारी व प्रशासन यांच्या विरुद्ध टीकेचे मोहोळ उठले आहे. ठाणे खाडीचे पाणी शुद्ध करुन त्याची विक्री करण्याचा प्रस्तावही चर्चेचा ठरला आहे. मात्र आयत्या वेळचे विषय म्हणून आणलेले तब्बल ८१ प्रस्ताव मंजूर करवून घेतले गेले. या प्रस्तावांची महापौर व उपमहापौर कार्यालयास गंधवार्ता नाही ही बाब धक्कादायक आहे. आयत्या वेळचा विषय म्हणून अत्यंत तातडीचा व अचानक उदभवलेला विषय आणला जाऊ शकतो. मात्र महासभेपुढे ३९२ नियमित मांडलेले विषय असताना आयत्या वेळचे ८१ प्रस्ताव कसे काय असू शकतात. मग या विषयांची कार्यक्रमपत्रिका काय आहे व ती नेमकी कुणाकडे आहे? ती लोकप्रतिनिधी व प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करुन का दिली गेली नाही? असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व प्रशासन यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापौर, उपमहापौर यांच्या कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे या विषयांमध्ये कोणकोणती प्रकरणे मंजूर झाली, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या संदर्भात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला छेडले असता त्यांनी आम्ही देखील आयत्या वेळच्या विषयांची विषयपत्रिका शोधत असल्याचा टोला लगावला.