मदरशांमध्ये सर्वेक्षणच नाही
By admin | Published: July 8, 2015 10:07 PM2015-07-08T22:07:36+5:302015-07-08T22:12:15+5:30
सहा ते १४ वयोगटातील शाळेपासून दुरावलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यसरकारने शनिवारी विशेष मोहीमेतील सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली आहे.
ठाणे : सहा ते १४ वयोगटातील शाळेपासून दुरावलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यसरकारने शनिवारी विशेष मोहीमेतील सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यात मुंब्रा, राबोडी या मुस्लीम बहुल परिसरातील मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण न केल्याने आता या सर्वेक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मदरशांत जाणारी मुले शाळाबाह्य ठरवली जातील, असे स्पष्ट करून राज्यात शनिवारी सर्वेक्षण करण्यात आले होते.
कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क असून शाळेपासून वंचित बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शनिवारी ठाणे शहरात ४ हजार २५० शिक्षक आणि ५० स्वयंसेवकांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले. ठाणे शहरात कधीच शाळेत न गेलेल्या मुलांची संख्या ८८० आहे. तर मध्येच शाळा सोडलेल्या मुलांची संख्या ११५४ इतकी आहे.
संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर सर्वेक्षणात पाच हजार ४२३ मुले शाळाबाह्यआहेत. विशेष म्हणजे, शहरी भागातील मुलांची संख्या ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे. राज्य शासनाने मदरशांमध्ये देण्यात येणारे शिक्षण हे शिक्षण पद्धतीला अनकुल नसल्यामुळे येथे जाणारी मुले ही शिक्षणबाह्य समजली जातील, असे सर्वेक्षणापूर्वी स्पष्ट केले होते. त्या निर्णयाला अनुसरून मुंब्रा आणि राबोडी या मुस्लीम बहुल परिसरात मदरशांमधून शिक्षण घेणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण होणे अभिप्रेत असताना शनिवारी पार पडलेल्या सर्वेक्षणांतर्गत ते होऊ शकले नाही. मुंब्य्रामध्ये नुकतेच राष्ट्रवादीतर्फेया प्रश्नावर राज्य सरकारच्या निर्णया विरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे या परिसरात जाऊन कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणच केले नाही. मुंब्रा व राबोडी परिसर वगळून उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या ठिकाणाचा सर्वेक्षण कार्यक्र म लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)