डोंबिवलीत सर्वेक्षणाचा थांगपत्ताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:48 AM2020-09-26T00:48:56+5:302020-09-26T00:49:14+5:30

धारावीत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

There is no trace of the survey in Dombivali | डोंबिवलीत सर्वेक्षणाचा थांगपत्ताही नाही

डोंबिवलीत सर्वेक्षणाचा थांगपत्ताही नाही

Next

अनिकेत घमंडी।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर दहा दिवसांनतरही ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेचा कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत प्रारंभ झालेला नाही. या योजनेत सहभागी होण्यास आशा वर्कर, शिक्षक यांनी ठाम विरोध दर्शवल्याने स्वयंसेवक मिळत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.


धारावीत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे नगरसेवकांनी या सर्वेक्षणाकरिता सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले होते. काही नगरसेवकांनी प्रभागात सर्व्हे करून अँटीजेन टेस्ट शिबिरांचे आयोजन केले होते. सर्वेक्षणाकरिता पुन्हा स्वयंसेवक कसे द्यायचे, असा नगरसेवकांचा प्रश्न आहे.


दोन महिन्यांपूर्वी आ. रवींद्र चव्हाण आणि रा.स्व.संघ, जनकल्याण समितीने कोरोना नियंत्रणाकरिता ७५ स्वयंसेवकांना ‘कोरोना योद्धा’ केले होते. त्यापैकी ६ जणांना लागण झाली. त्यावेळी डोंबिवली पूर्व पश्चिम, कल्याण पूर्वेतील हजारो नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. ज्यांच्यात लक्षणे दिसली त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
भाजपची ही मोहीम पाहून अन्य पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सर्वेक्षण योजना राबवली होती. आता पुन्हा कोणीही स्वत:हून सर्वेक्षणाकरिता पुढे येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

त्या योजनेसंदर्भात मोबाइलवर जेवढी माहिती आली तेवढीच. पण त्यानंतर प्रत्यक्ष कोणीही सर्व्हेसाठी आलेले नाही.
- नंदू म्हात्रे, नगरसेवक, काँग्रेस
सुरुवातीला रुग्ण मिळाल्यावर म्हात्रेनगरमध्ये काही इमारतींची तातडीने तपासणी केली, पण आता कसलाही सर्व्हे सुरु नाही.
- मुकुंद पेडणेकर, नगरसेवक

स्वयंसेवक, शिक्षक अशी पथके तयार करण्यात येत आहेत. मनपासह खासगी शाळांच्या शिक्षकांनी सहभागी व्हावे, याकरिता पत्रव्यवहार झाला आहे. जेथे नगरसेवकांनी स्वयंसेवक उपलब्ध करुन दिले आहेत, त्याठिकाणी काम सुरु झाले आहे.
- डॉ. प्रतिभा पानपाटील, आरोग्य अधिकारी, मनपा
बहुतांश नगरसेवकांनी आधीच त्यांच्या प्रभागात सर्व्हे केला होता. आता मनपाकडून सर्व्हे करण्याचे नियोजन सुरु असून टप्प्याटप्प्याने सर्व्हे करण्यात येईल. सामाजिक संस्थांसमवेत अधिकाऱ्यांचे बोलणे सुरु आहे. - विनीता राणे, महापौर
माझ्या प्रभागात मनपाकडून अद्याप सर्व्हे सुरु झालेला नाही. मी मात्र दोन ठिकाणी अ‍ॅण्टीजेन टेस्ट विनामूल्य करण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा लाभ नागरिक घेत आहेत.
- राहुल दामले, विरोधी पक्षनेते
माझ्या प्रभागात मी आधीच आरोग्यविषयक सर्व्हे राबवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेतच्या आॅनलाइन सेमिनारमध्ये मी सहभागी झालो होतो. माझ्या माहितीनुसार प्रभागात मनपाकडून सर्व्हे सुरु झालेला नाही.
- मंदार हळबे, नगरसेवक, मनसे
माझ्या प्रभागात अजून मनपाकडून कोणतेही आरोग्य पथक सर्वेक्षणाकरिता आलेले नाही. जेव्हा मनपाचे पथक येईल तेव्हा त्यांना हवे ते सहकार्य करण्यात येईल.
- विकास म्हात्रे, स्थायी समिती सभापती
आमच्या दोन्ही प्रभागात आम्ही शनिवारी सर्व्हे सुरु करीत आहोत. स्वयंसेवकांकडून सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरभर प्रत्येक प्रभागात तो उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे.
- राजेश मोरे, नगरसेवक, शिवसेना शहरप्रमुख, डोंबिवली
माझ्या प्रभागात सर्व्हे केला होता, आता तो पुन्हा करण्याचे नियोजन नाही. पण मनपाने सर्व्हे केला तर सहकार्य करण्यात येईल. पण पुन्हा स्वयंसेवक मिळणे कठीण आहे.
- खुशबू चौधरी, नगरसेविका, भाजप

Web Title: There is no trace of the survey in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.