मतदारयाद्यांचा घोळ काही संपेना
By admin | Published: June 30, 2017 02:46 AM2017-06-30T02:46:36+5:302017-06-30T02:46:36+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ जूनला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या. त्यात प्रचंड घोळ असून
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ जूनला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या. त्यात प्रचंड घोळ असून त्याला जबाबदार असलेल्या प्रशासनाच्या कारभाराविरोधात तसेच प्रसिद्ध झालेल्या यादीत दुरुस्तीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याचे मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी पालिकेने प्रारूप मतदारयादी तयार केली असली, तरी त्या कामासाठी नियुक्त केलेल्या सुमारे ५०० केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप सावंत यांनी केला. २५ जूनला याद्या प्रसिद्धीची मुदत असताना ती २७ जूनला केवळ संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. छापील याद्या २८ जूनला प्रसिद्ध करण्यात आल्या असल्या, तरी आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र त्या याद्या दिसत नसल्याचा दावाही त्यांनी केला.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांत प्रचंड घोळ असून प्रभाग २४ (उत्तन) मधील बहुतांश मतदारांची नावे प्रभाग २० (नयानगर) मध्ये दाखवली
आहेत. तसेच काशिमीरा येथील
सृष्टी परिसरातील इमारती नयानगरमध्ये दाखवण्यात आल्याने या इमारती नयानगरमध्ये कशा शोधाव्यात, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे. त्यातच, या याद्यांत एकाही मतदाराचे छायाचित्र नसल्याने बोगस मतदानाला वाव मिळणार असल्याचा दावा केला.
नेहमीप्रमाणे एका मतदाराचे नाव दुबारऐवजी तीन ते चार वेळा छापल्याचे दिसून आले आहे. मतदारांच्या माहितीसाठी तयार केलेल्या अॅपमध्ये मतदारांच्या नावांची नोंद योग्य असल्याचे दिसून येत असले, तरी यादीमध्ये त्यांच्या नावांची नोंद वेगळ्याच प्रभागांत दाखवली आहे. काहींची नोंद अॅपमध्ये दिसत असली, तरी यादीमधील नोंदीत ती व्यक्ती अस्तित्वातच नसल्याचे दाखवले आहे. मतदारनोंदणी मोहिमेद्वारे सुमारे ५१ हजार अर्ज दाखल झाले होते. त्यातील ४१ हजार २९६ अर्जांतील नोंद याद्यांत समाविष्ट करण्यात आली असून त्यातील सुमारे ३२ हजार नोंदींत घोळ आहे.
प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा
मतदाराच्या एकाच नावासह त्याचे छायाचित्र यादीत समाविष्ट करून पुनर्सर्वेक्षणानुसार आवश्यक दुरुस्ती करावी, या मागणीसाठी काँग्रेस थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे.
त्यावर कार्यवाही न झाल्यास प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे. तत्पूर्वी त्याचे निवेदन नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांना देण्यात आले. या वेळी गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद सामंत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासन सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.