शिवसेना-भाजपात काहीच आलबेल नाही, राजकारण तापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:07 AM2019-03-08T01:07:15+5:302019-03-08T01:07:23+5:30
मीरा-भाईंदर भाजपा व शिवसेनेत एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवण्यासह बहिष्कार घालण्याचा प्रकार थांबताना दिसत नाही.
मीरा रोड : मीरा-भाईंदर भाजपा व शिवसेनेत एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवण्यासह बहिष्कार घालण्याचा प्रकार थांबताना दिसत नाही. मंगळवारी खासदार राजन विचारे यांच्या वतीने झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे भाजपाने सपशेल पाठ फिरवली. निमंत्रण व बॅनरवर भाजपा नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांची छायाचित्रे व नावे असूनही कुणी आलेच नाही.
युती झाल्यानंतर शिवसेनेने शिवजयंतीदिनी घोडबंदर किल्ल्यावरील कार्यक्रमाचे सेनेने निमंत्रण देऊनही भाजपाने बहिष्कार घातला होता. तशी कबुलीच भाजपाने दिली होती. त्यानंतर, खासदार विचारे यांच्या प्रयत्यांनी उत्तन समुद्रात मंजूर दीपस्तंभाच्या भूमिपूजनावेळी भाजपाचे स्थायी समिती सभापती अॅड. रवी व्यास व जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे उपस्थित होते. मात्र, गेल्या रविवारी पालिकेच्या काशिमीरा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमास सेनेकडून केवळ विरोधी पक्षनेते राजू भोईर उपस्थित होते. ठाण्यात आदित्य ठाकरे व खासदार विचारेंचा आरोग्य मेळावा यामुळे आपण आल्याचा खुलासा भोईर यांनी केला होता.
>कार्यक्रमपत्रिकेवरून वाद
मंगळवारी विचारे यांच्या माध्यमातून मीरा रोडच्या शांतीनगर, भार्इंदरचे मुर्धा, उत्तन व चौक भागात विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी मात्र भाजपाचे आमदार, महापौर, उपमहापौर आदी पदाधिकारी तर सोडाच, नगरसेवकही फिरकले नाहीत. विचारे यांच्या कार्यक्रमपत्रिकेत व बॅनरवर भाजपाच्या अगदी स्थानिक नगरसेवकांपासूनची नावे व छायाचित्रे टाकण्यात आली होती.