भार्इंदरमधील भुयारी मार्गात गंभीर उणिवांचा अडथळा , भाजपाचा घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:22 AM2017-10-30T00:22:04+5:302017-10-30T00:22:18+5:30
भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन तर केले, मात्र या भुयारी मार्गात गंभीर स्वरूपाच्या उणिवा राहिल्याचे खुद्द भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेते
मीरा रोड : भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन तर केले, मात्र या भुयारी मार्गात गंभीर स्वरूपाच्या उणिवा राहिल्याचे खुद्द भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेते रोहिदास पाटील आणि नगरसेवक रवी व्यास यांनीच समोर आणल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी पाच अपघात झाल्याचेही पाटील यांनी म्हटल्याने नागरिकांना दिवाळी भेट देण्याच्या राजकारणात भुयारी मार्गाचे घाईघाईने उद्घाटन झाल्याचे स्पष्ट झाले.
पाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भार्इंदर पूर्व-पश्चिमेस जोडणाºया रेल्वे स्थानक येथील शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचे उद्घाटन थाटामाटात केले होते. वास्तविक, १७ वर्षांपासून येथे लहान वाहनांसाठी भुयारी मार्गाची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. काँग्रेस सरकारच्या आघाडी काळात मंजूर झालेल्या या भुयारी मार्गाचे काम विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांनी धीम्या गतीने सुरू होते. भाजपा-शिवसेना युतीच्या सत्ताकाळात काम जवळपास पूर्ण झाले. हा भुयारी मार्ग व पोचरस्त्यासाठी तब्बल १०० कोटींच्या घरात खर्च झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा आग्रह आमदार नरेंद्र मेहतांचा होता. त्यामुळे भुयारी मार्ग खुला केला जात नव्हता. आधीच अरुंद असलेल्या पूर्वेच्या जेसल पार्क भागात वाहनांची वर्दळ वाढली. भुयारी मार्ग सुरू केला, पण येथील फेरीवाले व अतिक्रमण मात्र कायम असल्याने जेसल पार्क, राहुल पार्क भागातील रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आंदोलनाच्या पवित्र्यानंतर स्थानिक नगरसेवक रोहिदास पाटील, नगरसेवक मदन सिंग, शानू गोहिल, मीना कांगणे व माजी नगरसेवक यशवंत कांगणे यांनी रहिवाशांनी चंद्रेश हाइट्समध्ये बोलवलेल्या बैठकीला हजेरी लावली. रहिवाशांसोबत आयुक्तांना भेटून फेरीवाले हटवण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपा नगरसेवक व रहिवाशांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेतली. या वेळी पाटील यांनी भुयारी मार्गातील १४ त्रुटींची जंत्रीच लेखी स्वरूपात आयुक्तांना दिली. भुयारी मार्गाच्या दोन्ही प्रवेशमार्गावर रस्ता दुभाजक नसल्याने वाहने वा दुचाकी भरधाव येत असल्याने पहिल्याच दिवशी ५ अपघात झाल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून त्वरित रस्ता दुभाजक बसवण्याची मागणी केली आहे.
भुयारी मार्गाच्या आत अंधार, उतार व वळण असल्याने धूम स्टाइलने दुचाकी चालवली जाते. त्यामुळे चार ठिकाणी गतिरोधक बसवावेत. भुयारी मार्गातील धूळ-माती अग्निशमन दलाकडील बंबाचा वापर करून उच्च दाबाने पाणी फवारून साफ करावी. दैनंदिन सफाईची जबाबदारी निश्चित करावी. आवश्यक ठिकाणी दिशादर्शक पांढरे पट्टे मारावेत. ओस्तवाल आॅर्नेटनाक्यावर वाहन वळवण्यासाठी कोपरा रुंद करणे. अंबामाता मंदिर, आशीर्वाद रुग्णालय व रेल्वे समांतर मार्गावरील झाडे काढणे आणि बेकायदा पार्किंग होणाºया वाहनांवर कारवाई करणे. येथील फेरीवाल्यांबद्दल कायमचा तोडगा काढावा. चंद्रेश हाइट्स इमारतीला आश्वासन दिल्याप्रमाणे प्रवेशद्वार बनवून द्यावे. नवघर व भार्इंदर पोलिसांना कळवून पोलीस तैनात करावेत. वाहतूक पोलीस नेमावेत. भुयारी मार्गात सीसीटीव्ही लावावेत. भुयारी मार्गाची लांबी जास्त असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास इन्व्हर्टरची सोय करावी. रिक्षा संघटनांशी बोलून शेअर भाड्याचे फलक लावावेत, आदी १४ मागण्या पाटील यांनी केल्या आहेत.