ठाण्यात जाणवतोय कोव्हिशिल्ड लसीचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 09:14 AM2021-03-16T09:14:38+5:302021-03-16T09:14:44+5:30
दुसऱ्या डोससाठी पुरेसा साठा उपलब्ध : ठामपाचा दावा, कोव्हॅक्सिनचेही मिळाले १० हजार डोस
ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. कारण ठाण्यात कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपत आल्याची बाब उघडकीस आली आहे.
त्यामुळे आधी ज्यांनी ज्यांनी ही लस घेतली आहे, त्यांना या लसीचा दुसरा डोस मिळणार की नाही? याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. परंतु, कोव्हिशिल्डचा पुरेसा साठा करून ठेवला असून दुसरा डोस वेळेवर दिला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वृद्ध, फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील विविध व्याधीग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मनपाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शहरात खासगी ११ व ४२ शासकीय अशा ५३ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित केली आहेत. त्यानुसार, कोव्हिशिल्ड लसीद्वारे दररोज साडेसात हजार नागरिकांचे लसीकरण होते. त्यानुसार आतापर्यंत ८२ हजार नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सध्या कोव्हिशिल्डचा साठा जेमतेम दोन दिवस पुरेल इतकाच उपलब्ध असल्याची माहिती पुढे आल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेतली. तसेच, लस पुरवठ्याबाबत आढावा घेत शासन दरबारीही पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली. यावेळी आयुक्तांनी १० हजार कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा आल्याचे स्पष्ट करून त्याबाबतच्या प्रशिक्षणाला दुजोरा दिला. मात्र, यापूर्वी ८२ हजारांहून अधिक नागरिकांना पहिला डोस कोव्हिशिल्डचा दिलेला असताना त्यांना दुसरा डोस अन्य लसीचा चालणार नाही. तेव्हा, कोव्हिशिल्ड लस घेतलेले नागरिक धास्तावले आहेत. परंतु, यासंदर्भात आयुक्तांनी सांगितले की, आधी ज्या ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डची लस घेतलेली आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी त्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे त्यांना कोव्हिशिल्डचीच लस दिली जाईल.
लसीचा साठा मिळाल्याने डोंबिवलीत लसीकरण सुरू -
- डोंबिवली : कोरोनाच्या लसीच्या तुटवड्यामुळे चार दिवसांपासून खाजगी रुग्णालयांत ठप्प झालेली लसीकरणाची मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि
कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयासह सात खासगी रुग्णालयांत सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून लसीकरण सुरू झाले. बहुतांशी ठिकाणी ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना लस दण्यात आली.
एमआयडीसीतील एका खाजगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सांगितले की, केडीएमसीकडून चार दिवसांनी आज लसीचा साठा मिळाला. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या १५० जणांना दिवसभरात लस दिली गेली.