डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी कार्यक्षम अधिकारीच हवेत
By अनिकेत घमंडी | Published: March 27, 2018 06:35 PM2018-03-27T18:35:15+5:302018-03-27T18:35:15+5:30
शहराच्या पश्चिमेला स्थानक परिसरात फेरीवाले बसत नाहीत हे केवळ महापालिका प्रशासनाच्या ईच्छाशक्तीमुळेच होऊ शकते. पण तशी ईच्छाशक्ती पूर्वेला दिसून येत नसल्याने अशा अकार्यक्षम अधिका-यांना येथून तात्काळ बदलावे अशी मागणी भाजपा नगसेरवकांनी केली आहे.
डोंबिवली: शहराच्या पश्चिमेला स्थानक परिसरात फेरीवाले बसत नाहीत हे केवळ महापालिका प्रशासनाच्या ईच्छाशक्तीमुळेच होऊ शकते. पण तशी ईच्छाशक्ती पूर्वेला दिसून येत नसल्याने अशा अकार्यक्षम अधिका-यांना येथून तात्काळ बदलावे अशी मागणी भाजपा नगसेरवकांनी केली आहे. पण महापालिकेकडे कार्यक्षम अधिकारी नाही तो दाखवा, आम्ही तात्काळ बदलीच्या मागे लागू असा पवित्रा स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांनी घेतला.
ग आणि फ प्रभागात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असून या ठिकाणी सर्रासपणे १५० मीटर, १०० मीटरमध्ये फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाईची मागणी नगरसेवक करत असूनही त्याचे गांभिर्य कोणालाच नाही. त्यामुळे अकार्यक्षम ठरलेले प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत आणि अमित पंडित या अधिका-यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. फ प्रभागामधून नगरसेवक विश्वदीप पवार तर ग मधून नितीन पाटील यांनी ही मागणी केली असून नगरसेवक विशू पेडणेकर यांनीही अधिका-यांचे काहीतरी साटेलोटे असल्याशिवाय फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही असे होणार नाही. महासभा असली, दिल्लीतील केंद्राच्या सर्व्हेक्षणाची फेरी असली की फेरीवाले सक्तीच्या रजेवर जातात, पण त्यानंतर मात्र स्थिती जैसे थे होते. हे सगळ केवळ फेरीवाल्यांच्या आणि अधिका-यांच्या संगमतानेच होत असल्याचे पवार म्हणाले.
जर पारदर्शक कारभार अधिका-यांनी केला असता तर वस्तूस्थिती वेगळी असती, पण तसे होत नाही, अधिकारी केवळ मनुष्यबळाचे कारण पुढे करतात, त्यामुळेच समस्या सुटणे तर लांबच राहीले आहे. अलिकडच्या काळात फेरीवाले वाढले असून त्यावरही कोणाचाही अंकुश नाही, लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर अंकुश नाही असे म्हणणे संयुक्तिक होत नसल्याचे सांगत पवार म्हणाले की, आता फेरीवाला प्रश्नी सत्ताधा-यांनी आंदोलन केले, यापेक्षा आणखी काय करायला हवे. यावरुनही अधिकारी झोपेच सोंग घेत असतील तर स्थिती भयंकर आहे. यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
नेमकी कोर्ट आॅर्डर काय आहे याचा मला अभ्यास करावा लागणार आहे. त्याशिवाय मी फेरीवाल्यांवर काय कारवाई करायची याची दिशा ठरवू शकत नाही. पण न्यायालयाच्या आदेशांनूसार कारवाई करतानाच त्यांना पर्यायी जागेसंदर्भात आधी काय पाठपुरावा झाला आहे याचाही निश्चितच विचार केला जाईल - गोविंद बोडके, आयुक्त-केडीएमसी
ग आणि फ प्रभागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ नाही. जेव्हा चार प्रभाग मिळून ४०-४५ जणांचा स्टाफ दिला होता तेव्हा महिनाभर फेरीवाले बसले नव्हते. पुन्हा तसाच स्टाफ द्यावा, मी स्थिती नियंत्रणात आणतो अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे - परशुराम कुमावतम ग प्रभागक्षेत्र अधिकारी
मी फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत २१ जणांवर गुन्हे दाखल केले असून सोमवारीच एकावर अटकेची कारवाई झाली आहे. फ प्रभाग अधिकारी पंडीत यांनी मनुष्यबळाची विभागणी केली, अन्यथा हा प्रश्न उद्भवला नसता - विजय भामरे, फेरीवाला कारवाई पथक प्रमुख, ग प्रभाग