वाहतूक सुरक्षा सप्ताहाची गरजच पडू नये
By admin | Published: January 10, 2017 06:21 AM2017-01-10T06:21:18+5:302017-01-10T06:21:18+5:30
आयुष्य अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कारणासाठी केलेली घाई जीवापेक्षा महत्त्वाची नाही. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांनी
ठाणे : आयुष्य अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कारणासाठी केलेली घाई जीवापेक्षा महत्त्वाची नाही. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांनी सजग राहण्याचे आवाहन करतानाच सुरक्षेसारख्या मूलभूत प्रश्नासाठी कार्यक्रम घेण्याची गरज पडता कामा नये, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सोमवारी येथे केले.
सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक विभागाच्या वतीने साकेत मैदानावर ‘माझी रिक्षा माझी दीक्षा,’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे उपस्थित होते. यावेळी बोलताना कपिल देव यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व आॅटोरिक्षाचालकांना सांगितले.
क्रिकेट खेळताना खेळाडू पूर्वी हेल्मेट, गार्ड यासारख्या सुरक्षाविषयक साहित्यांचा वापर करीत नव्हते. काळानुरूप परिस्थिती बदलली. आता सुरक्षाविषयक साहित्य वापरल्याशिवाय खेळाडूला मैदानावर प्रवेशच मिळत नाही. आॅटोरिक्षाचालकांनीही सुरक्षेचे महत्त्व ओळखण्याची गरज आहे. स्वत:च्या आणि इतरांच्याही सुरक्षेची जबाबदारी चालकांवर असते. त्यामुळे गाडी चालवताना मोबाइल फोनचा वापर करणे, उगाच घाई करणे, नियमांचे पालन न करणे सर्वांसाठीच घातक आहे. मुंबई संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे येथील आॅटोरिक्षाचालकांची जबाबदारी जास्तच आहे, असे कपिल देव यावेळी म्हणाले.
रिक्षाचालकांनी नेहमी सजग असावे. गाडीत बसलेला प्रवासी संशयास्पद वाटल्यास लगेच पोलिसांना कळवावे. यातून संभाव्य गुन्हे टाळता येतील, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सर्व चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची दीक्षा दिली. नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना गणवेश आणि वाहतूकमित्र सामग्रीचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्रीदीप्ती भागवत यांनी केले. (प्रतिनिधी)