दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असावे, महापौरांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 01:19 PM2021-05-22T13:19:05+5:302021-05-22T13:19:13+5:30
दिव्यांग कला केंद्राचे अध्यक्ष किरण नाकती यांची महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी
ठाणे : दिव्यांगांच्या लसीकरणासाठी आदित्य प्रतिष्ठान चा पुढाकार घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण ड्राईव्ह इन स्वरूपात अन्यथा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तळमजल्यावर एखादे लसीकरण केंद्र शहरातील समस्त दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवावे अशी मागणी आदित्य प्रतिष्ठान ,दिव्यांग कला केंद्राचे अध्यक्ष किरण नाकती यांनी ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नाकती यांच्या या मागणीला महापौर नरेश म्हस्के यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी याबाबतची मागणी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे निवेदनातून केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने ही मागणी मान्य झाल्यास शहरातील हजारोंच्या संख्येने असणार्या दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाचा प्रश्न निकालात निघणार आहे. आदित्य प्रतिष्ठान गेली 14 वर्षे सातत्याने विविध उपक्रम ठाणे शहरात राबवत आहे. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर पडत आहे. तसेच वुई आर फॉर युच्या माध्यमातून समस्त ठाणेकरांना कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिक व कोरोना रुग्ण ,त्यांचे नातेवाईक यांना विविध सेवा देण्याचं आजही करत आहेत. प्रतिष्ठान च्या वतीने दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा दिव्यांग कला महोत्सव देखील प्रतिष्ठान च्या वतीने यशस्वीपणे आयोजित केला आहे. तसेच दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून प्रतिष्ठान ने दिव्यांग मुलांच्या कलागुणांना नेहमीच वाव दिला आहे. त्यामुळे केंद्रातील मुलांनी आजवर अनेक कार्यक्रम , उपक्रमात , स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे.ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सध्याच्या घडीला सुरू आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामध्ये तूर्तास ,18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण काही काळ थांबले असले तरी जास्तीजास्त नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी ठाणे महानगरपालिका कटिबद्ध आहे. मात्र त्यात दिव्यांग व्यक्तींना देखील स्वतंत्र पणे लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यास दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लस देणे सहज शक्य होईल. मात्र याबाबत ठाणे मनपा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.