खड्डे, माती, धूळ, खडी, चिखल जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:44+5:302021-04-30T04:50:44+5:30
डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसीतील निवासी भागांमधील रस्त्यांची रडकथा पाच ते सहा वर्षांपासून कायम आहे. खड्डे, माती, धूळ आणि खडी ...
डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसीतील निवासी भागांमधील रस्त्यांची रडकथा पाच ते सहा वर्षांपासून कायम आहे. खड्डे, माती, धूळ आणि खडी यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी मारलेले डांबराचे पॅचही त्रासदायक ठरत आहेत. ठाकुर्लीतील रस्त्यांची डागडुजी झाली; पण निवासी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
एमआयडीसी परिसरातील औद्योगिक आणि निवासी भागांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पाच वर्षांहून अधिक काळापासून नागरिकांची गैरसोय गैरसोय होत आहे. पावसाळ्यात जीवघेणे खड्डे, तर इतर वेळी धुळीचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. सर्व्हिस रोडवरही सातत्याने सुरू असलेल्या विकासकामांमुळे तेथे मातीचे ढिगारे आणि चिखल, हेच चित्र सातत्याने दिसून येते.
फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान संबंधित रस्त्यांची पाहणी करण्यात आली होती. यावेळी केडीएमसी आणि एमआयडीसीने रस्त्यांच्या कामासाठी ५०-५० टक्के खर्च करावा, असे आदेश दिले गेले होते. त्यानुसार येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा अंदाचे ११० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात रस्त्यांच्या बांधणीबरोबरच दुतर्फा गटार बांधणीची कामे केली जाणार होती. परंतु, अद्याप या कामांना मुहूर्त मिळालेला नाही.
निदान डांबरीकरण तरी करा
ठाकुर्लीतील ९० फुटी आणि रेल्वे समांतर रस्त्यांवरही दोन वर्षे विकासकामांसाठी खोदकाम सुरू होते. काही ठिकाणी एक दिशा मार्गाने वाहतूक सुरू होती. परंतु, आता तेथील कामे तसेच तेथील रस्त्यांचे डांबरीकरणही मार्गी लागले आहे. त्यामुळे अडीच वर्षांनी का होईना स्थानिकांसह वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना काँक्रिटचे रस्ते नको, निदान सद्यस्थितीला खड्डेमय रस्त्यांवर डांबरीकरण तरी करावे, याकडे निवासी भागातील रहिवाशांकडून लक्ष वेधले जात आहे.
----------