केडीएमसीसह २७ गावांत होणार ११० कोटींचे १२ रस्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:14 AM2019-03-07T00:14:19+5:302019-03-07T00:14:28+5:30
कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत.
कल्याण : कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहर व ग्रोथ सेंटरच्या परिसरात सुसज्ज व चकाचक रस्ते होणार आहेत.
कल्याण-डोंबिवली पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासकामांसाठी फारसा निधी मिळत नाही. २७ गावांतील रस्त्यांचा विकास एमएमआरडीएद्वारे करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिली होती. त्यानुसार, एमएमआरडीएने रस्ते विकासासाठी ११० कोटींची कामे मंजूर केली आहेत. यापूर्वी २७ गावांतील कल्याण ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. कल्याण ग्रोथ सेंटरसाठी १० गावे निवडली आहेत. मात्र, तेथील जमीनमालकांचा ग्रोथ सेंटरला जागा देण्यास विरोध आहे. त्यावर तोडगा निघू शकलेला नाही.
ग्रोथ सेंटरसाठी रस्ते व अन्य पायाभूत सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे. या हेतूने मंजूर केलेल्या १२ रस्त्यांपैकी शीळ रस्ता ते नारिवली, पाइपलाइन रस्ता ते कोळे, घेसर, आशेळे ते शक्तिपीठ, भालगाव ते वसार बसस्टॉप, मयूर हॉटेल ते तुकाराम चौक दावडी, पाइपलाइन रस्ता ते हेदुटणे, शिरढोण हे सहा रस्ते २७ गावांतील आहेत. त्यापैकी घेसर, कोळे, दावडी, हेदुटणेचा परिसर ग्रोथ सेंटरशी निगडित आहेत. याशिवाय मोहने रस्ता, इंदिरानगर आदिवासीपाडा ते नांदप, आधारवाडी रस्ता, पांडुरंगवाडी ते गावदेवी, छत्री बंगला ते मंगेशीधाम, सेंट झेविअर स्कूल ते चंद्रभागा टॉवर हे सहा रस्ते काँक्रिटचे होणार असून, त्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.
>१४ गावांनाही होणार फायदा
२७ गावांतील ६२ कोटी रुपये खर्चाचे रस्ते मंजूर करण्यासाठी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातून नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांतील रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यात गोरपे ते काकोळे, कोळे ते उत्तरशीव, पाली ते शिरवली, करवले ते उत्तरशीव, करवले ते नेवाळी या रस्त्यांचा समावेश आहे. ही कामे मंजूर करण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. कल्याण-डोंबिवलीतील सगळ्यात महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जात आहे. हा प्रकल्प ८०० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात १०३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून कल्याण पूर्व व पश्चिमेतील तीन रस्ते काँक्रिटचे करण्यात आले. हे काम महापालिकेने केले होते. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आणखीन ३०० कोटींचा निधी प्राप्त झाल्यावर २४ रस्ते विकसित केले होते. या निधीतून ५० कोटी रुपये वाचले होते. ते परत न पाठवता त्यातूनही अंतर्गत रस्ते तयार करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.