ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:59 AM2024-10-23T06:59:12+5:302024-10-23T07:03:27+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि राजू पाटील हे नेतेमंडळी रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या गुरुवारी म्हणजे, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात राहणार असल्याने दुर्मीळ असा ‘गुरुपुष्यामृत योग’ असून हाच योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, भाजपचे आ. संजय केळकर, अविनाश जाधव, राजू पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार तर अविनाश जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात हजेरी लावणार आहेत.
अनेकांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज घेतले. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे हे निवडणूक लढविणार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या जागेची मागणी शरद पवार गटाने केली. परंतु, उद्धवसेना या जागेसाठी आग्रही आहे.
ठाकरे, पवार ठाण्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाणे विधानसभेतील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव, तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने या दोघांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हजेरी लावणार आहेत. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज दाखल करतील. स्वत: शरद पवार हे हजेरी लावणार आहेत.
चांगला मुहूर्त
२४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात रहाणार असल्याने ‘गुरुपुष्यामृत योग’ आला आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून (सकाळी ६.३७) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत (शुक्रवारी सकाळी ६.३७) हा योग आहे.
अजित पवार गटाचा कल्याण ग्रामीणवर दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे उमेदवार म्हणून पक्षाचे विद्यमान आ. राजू पाटील यांचे नाव घोषित केले आहे. त्याचबरोबर महायुती मधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. जगन्नाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे असल्याचा दावा केला.
कल्याण ग्रामीणमध्ये महायुुतीचा आमदार नाही. त्याठिकाणी मनसेचा आमदार आहे. मनसे महायुतीमध्ये सामील नाही. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाला उमेदवारी मिळावी, असे पत्र जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी अजित पवारांना दिले. या मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते हे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. मंगळवारी दुपारी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक दिल्लीला गेल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.