नवे स्थानक असणार चकाचक, सुमारे २०० झोपड्या महापालिका हटवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:18 AM2018-07-07T05:18:46+5:302018-07-07T05:18:55+5:30
मनोरुग्णालयाच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या नव्या ठाणे स्थानकाला अखेर राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला असून टीडीआरच्या बदल्यात त्याचा विकास केला जाणार आहे.
ठाणे : मनोरुग्णालयाच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या नव्या ठाणे स्थानकाला अखेर राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला असून टीडीआरच्या बदल्यात त्याचा विकास केला जाणार आहे. यामुळे येत्या काळात जुन्या ठाणे स्थानकाचा भार हलका होणार आहे. पालिका आता या जागेवर वसलेल्या सुमारे २०० झोपड्या हटवणार असून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या नव्या ठाणे स्टेशनला मेट्रोदेखील जोडली जाणार असून, त्याठिकाणी येणाऱ्या अडीच लाख प्रवाशांसाठी इतर सोयीसुविधांची व्यवस्था केली जाणार आहे.
ठाणे रेल्वेस्थानक आणि परिसरातील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून मागील सुमारे १० वर्षे ठाणे आणि मुलुंड यांच्यादरम्यान मनोरुग्णालयालगतच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी केली होती. अनेक अडसर पार करून अडथळ्यांची शर्यत पार करून नव्या ठाणे स्टेशनला मुहूर्त सापडला आहे. ठाणेकर आणि खासकरून ठाण्यातील रेल्वे प्रवासीवर्गासाठी या नव्या ठाणे स्टेशनचा मोठा लाभ होणार आहे. ठाणे शहरातील व खासकरून स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी यामुळे सुटणार आहे.
या नवीन स्थानकामुळे अनेक फायदे होणार आहेत. यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वेस्टेशनचा गर्दीचा मोठा बोजा कमी होणार आहे. ठाणे व मुलुंडच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये ठाणे परिवहनसेवेचाही फायदा होणार
असून रेल्वे अपघातांवर आळा
बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ठाण्याच्या अडीच लाख प्रवाशांना होणार लाभ
ठाणे स्टेशनवरून रोज साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात. या नवीन स्टेशनमुळे जवळपास ३१ टक्के प्रवासी नवीन स्टेशनवरून प्रवास करणार आहेत, तर मुलुंडचे २१ टक्के प्रवासी या नवीन स्थानकाचा फायदा घेणार आहेत. म्हणजेच जवळपास दोन ते अडीच लाख ठाण्याचे प्रवासी या नवीन स्थानकावरून प्रवास करणार आहेत. यामुळे ठाणे स्टेशनचा प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या नवीन स्थानकामुळे घोडबंदर, पोखरण रोड नंबर १ व २, वागळे परिसर, लोकमान्यनगर, आनंदनगर, कोपरीच्या प्रवाशांनादेखील दिलासा मिळणार आहे. तर, मुलुंडमधील मुलुंड पश्चिम भागातील म्हणजे वीणानगर, वैशालीनगर, किशननगर या भागांतील प्रवाशांना हे स्टेशन जवळ पडणार आहे.
अडीच वर्षांत उभे राहणार नवे स्थानक : भूमिपूजन झाल्यापासून दोन ते अडीच वर्षांत हे स्टेशन उभे राहणार आहे. नव्या स्थानकाच्या उभारणीसाठी साधारणत: २८९ कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाºयांनी त्या ठिकाणी सर्वेक्षण केले असून या जागेवर अतिक्र मणे आहेत. या जागेवरील २०० कुटुंबांचे पुनर्वसन पालिकेने विविध ठिकाणी उभारलेल्या घरांमध्ये करण्याचा ठरावही पुढे आला आहे. पालिकेने येथील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची हमीदेखील घेतली आहे.
२८९ कोटींचा खर्च अपेक्षित
या संपूर्ण प्रकल्पासाठी २८९ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये रेल्वेस्टेशन, नाल्यावरील पुलाचे काम, रेल्वे ट्रॅक, एफओबी, प्लॅटफॉर्म व सिग्नलचे काम होणार आहे. तसेच आजूबाजूच्या परिसराचे कामदेखील यामाध्यमातून केले जाणार असून यामध्ये पार्किंग, इन्व्हेटर डेक, कम्पाउंड वॉल ही कामे केली
जाणार आहेत.
तीन रस्ते जोडणार
ठाण्यातील स्टेशन परिसरातील सॅटीसप्रमाणे तीन रस्ते जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे. आनंदनगर चेकनाका, साठेवाडीतून डीपी रस्ता व मुलुंड चेकनाका रस्ता या तीन रस्त्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. हे सर्व रस्ते २४ मीटरचे असणार आहेत.
स्टेशनशेजारी मेट्रोस्थानक
भविष्यात ठाणे मेट्रोला हे स्टेशन जोडले जाणार आहे. या नवीन स्टेशनशेजारी मेट्रोचे स्थानक असणार आहे. ठाण्यापासून सव्वा किलोमीटर, तर मुलुंडपासून सव्वा किलोमीटर असे अंतर असून मुलुंड आणि ठाण्याच्या मध्यभागी हे नवीन स्टेशन असणार आहे.
पालिकेचा कमर्शिअल प्लाझा
नव्या स्थानक परिसरात तिकीटघर, बस टर्मिनल आणि कमर्शिअल प्लाझा उभारण्याची पालिकेची तयारी आहे. सध्या ठाणे ते सीएसटी (ठाणे लोकल) या धीम्या मार्गावर १७२ आणि जलद मार्गावर १२ फेºया आहेत. सीएसटीहून ठाण्यापर्यंत येणाºया लोकल या नव्या स्थानकावर दाखल होतील आणि तिथूनच सुटतील, अशा प्रकारे नियोजन केले जाणार आहे.