पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये सरकार किंवा मंत्र्यांचा हस्तक्षेप राहणार नाही- शंभुराजे देसाई
By जितेंद्र कालेकर | Published: February 4, 2024 06:15 PM2024-02-04T18:15:57+5:302024-02-04T18:16:22+5:30
महेश गायकवाड यांच्याशी संवाद झाला नाही: शस्त्रक्रिया पूर्ण पण काही प्रमाणात काळजी
ठाणे: उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह दोघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या कार्यवाहिमध्ये सरकार किंवा मंत्र्यांचा हस्तक्षेप राहणार नाही. नि:पक्षपणे या प्रकरणाचा तपास केला जाईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री शंंभुराज देसाई यांनी ठाण्यात दिली. गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आल्याचीही माहिती देसाई यांनी रविवारी दिली.
गोळीबाराच्या घटनेनंतर जखमी महेश गायकवाड यांच्या भेटीसाठी पालकमंत्री देसाई हे ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण त्यांना केवळ लांबूनच पाहिले. जास्त वेळ थांबणे किंवा त्यांच्याशी बोलणे झाले नसल्याचे रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
त्यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काळजी करण्यासारखी थोडी परिस्थिती आहे. गायकवाड यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांचे शथीर्चे प्रयत्न सुरू आहेत. निश्चित ते यातून बाहेर येतील आणि उपचाराला प्रतिसाद देतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांच्या कोणत्याही कारवाईमध्ये सरकार किंवा सरकारचा कोणता मंत्री कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करीत नाही. कायदा कायद्याचे काम करील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी रुग्णालयात मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सीसीटीव्ही कसे लिक झाले?
महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. त्याचा व्हिडिओ कसा लिक झाला? याबाबतच्या प्रश्नावर पालकमंत्री निरुत्तर झाले. याबाबत उद्धव ठाकरे काय बोलले? हे आपल्याला माहित नसल्याचेही ते म्हणाले.