उल्हासनगरात हवेचे प्रदूषण मोजणारी यंत्रणा राहणार उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:36+5:302021-08-12T04:45:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी हवा गुणवत्ता मोजणी केंद्र गोलमैदानात उभे राहणार आहे. महापालिका उपायुक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी हवा गुणवत्ता मोजणी केंद्र गोलमैदानात उभे राहणार आहे. महापालिका उपायुक्त मदन सोंडे, प्रदूषण मंडळाचे शंकर वाघमारे यांच्या हस्ते सोमवारी (दि. ९) भूमिपूजन झाले. येणाऱ्या तीन महिन्यांत यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी उपायुक्त सोंडे यांनी दिली.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या क्लीन एअर प्रोग्रॅमअंतर्गत हवेचे सर्वाधिक प्रदूषण करणारी शंभर शहरे निवडण्यात आली असून, त्यामध्ये उल्हासनगरचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील येत्या तीन वर्षांत ३५ टक्क्यांनी, तर पाच वर्षांत ५० टक्क्यांनी हवेचे प्रदूषण कमी करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. गोलमैदान परिसरात हे केंद्र उभारण्यात येणार असून ते तीन महिन्यात कार्यरत होणार आहे. शहराच्या चोहोबाजूंची हवेची गुणवत्ता तपासणे, त्यामागची कारणे शोधणे आणि त्यानुसार गुणवत्ता सुधारण्यासाठी नियोजन करणे, अशा तीन टप्प्यांत क्लीन एअर प्रोग्रॅम राबविण्यात येणार असल्याची माहिती एमपीसीबी अधिकारी शंकर वाघमारे यांनी दिली. यावेळी एमपीसीबी अधिकारी प्रमोद लोणे, साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मालमत्ता विभागाच्या विशाखा सावंत उपस्थित होत्या.
या प्रकल्पात सतत हवेची तपासणी केली जाणार असून यामुळे शहरात कोणत्याही कंपनीने विषारी रसायन सोडले, प्लास्टिक जाळले, टायर जाळले, केमिकल टँकर सोडले, आदींची माहिती तत्काळ मिळणार आहे. तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सुरू करणे, सीएनजी वाहनांना प्रोत्साहन देणे, सिग्नल यंत्रणा उभारणे, पीयूसी तपासणी वाढविणे, असेही उपक्रम राबविण्याचा फायदा होणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे यांनी दिली.