‘त्यांची’ ही वेतनाअभावी होतेय परवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 07:41 PM2018-03-12T19:41:49+5:302018-03-12T19:41:49+5:30
कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी परवड सुरू झाली आहे. परिवहन कर्मचा-यांप्रमाणे वेतनाविना घर चालवायचे तरी कसे अशी म्हणण्याची वेळ संबंधित सुरक्षा कर्मचा-यांवर देखील ओढावली आहे.

केडीएमटी कर्मचा-यांचे वेतन विलंबाने मिळणे हि तर नित्याचीच बाब आहे. महिन्याचे वेतन हे दुस-या महिन्याच्या अखेरीस मिळते काहीवेळेस त्याच्याहून अधिक कालावधी लागतो. हे नेहमीचे झाले असताना नुकतेच याप्रकरणी कर्मचा-यांनी चककाजाम आंदोलन छेडले होते. त्यानंतर लागलीच वेतन महापालिकेकडून अदा केले गेले. परिवहन उपक्रमातील वेतन हे सर्वस्वी केडीएमसीच्या अनुदानावर अवलंबुन आहे. यात उपक्रमातील वाहक-चालक आणि कर्मचा-यांची परवड होत असताना महापालिकेला सुरक्षाविभागासाठी घेतलेल्या बोर्डाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर देणे दुरापस्त झाले आहे. महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे ३४ कर्मचारी केडीएमसीने घेतले आहेत. महापालिका क्षेत्रात ते कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. परंतू जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे वेतन त्यांना मार्च महिना उजाडला तरी मिळालेले नाही. या बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना २० हजाराच्या वर वेतन मिळत असलेतरी त्यांच्या हातात १४ ते १५ हजारापर्यंतच वेतन पडते. मात्र गेले दोन महिने हे कर्मचारी वेतनविना आहेत. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सुरक्षा कर्मचा-यांना फेब्रुवारीचे वेतन देखील मार्च महिन्याच्या दुस-या आठवडयात मिळाले आहे. वेतन उशीराने मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जातेय. दरम्यान बोर्डाच्या सुरक्षारक्षकांच्या वेतनाबाबतची फाईल ही लेखाविभागाकडे पाठविल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगितले जात असलेतरी याची अंमलबजावणी होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.
यासंदर्भात केडीएमसीचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी वेतन दोन महिने मिळालेले नाही हे वास्तव असून त्यांच्या वेतनासंदर्भातील फाईल लेखाविभागाकडे पाठविली आहे. आपल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन देखील आताच झाले असून बोर्डाच्या सुरक्षारक्षकांचे वेतनपण लवकरच दिले जातील असे सांगितले.