‘त्या’ पडक्या शाळेत भरतात गर्दुल्यांचे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:20 PM2018-02-09T21:20:55+5:302018-02-09T21:25:42+5:30
केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात जागेअभावी वाहन पार्किंगची समस्या जटील बनली असताना या पडक्या वास्तूतील अवैध धंदयांमुळे आवारातील महापालिकेच्या कार्यालयाची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.
डोंबिवली: केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात जागेअभावी वाहन पार्किंगची समस्या जटील बनली असताना या पडक्या वास्तूतील अवैध धंदयांमुळे आवारातील महापालिकेच्या कार्यालयाची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विभागीय कार्यालय परिसरात असलेली ही शाळा गेल्या आठ ते दहा वर्षापासून बंद आहे. पटसंख्येअभावी बंद पडलेल्या या शाळेला सद्यस्थितीला अवकळा आली आहे. भिंतींची झालेली पडझड, शाळेच्या छपरावरील कौल तुटलेली, तसेच अनेक वर्षे बंद असलेल्या वर्गामध्येही झाडे देखील उगवली आहेत. या वर्गांच्या दरवाजांना टाळे लावले होते परंतू गर्दुल्यांकडून ती टाळीही तोडण्यात आली असून या शाळेला एकप्रकारे खंडहराचे स्वरूप आले आहे. या शाळेला लागूनच महापालिकेचा आपत्कालीन कक्ष आहे. त्याचीही पुरती दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालय परिसरातील वाहनपार्किंगची समस्या दिवसागणिक बिकट बनत चालली आहे. एकिकडे जागा अपुरी ठरत असताना दुसरीकडे ही पडकी शाळा एकप्रकारे अडगळीची ठरली आहे. यात आता गर्दुल्ले यांचाही मुक्त संचार होऊ लागल्याने याची तत्काळ गांभिर्याने दखल घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या गर्दुल्यांच्या प्रतापामुळे शाळेत मागील काही दिवसांमध्ये आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. मागील भागातून या शाळेच्या वास्तूत बिनदिककतपणे प्रवेश केला जात असल्याने विभागीय कार्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची या गर्दुल्यांचा बंदोबस्त करताना चांगलीच धावपळ उडत आहे. विशेष बाब म्हणजे विभागीय कार्यालयाच्या आवारात सुरक्षेसाठी सी सी टिव्ही कॅमेरे लावण्याबाबतही प्रशासनाची उदासिनता कायम राहीली आहे. यासंदर्भात सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित पडीक शाळा पाडल्यास वाहन पार्किंगला पुरेशी जागा उपलब्ध होईल तसेच सी सी टिव्ही कॅमेरे लावण्याबाबतही पत्रव्यवहार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.