'ते' दहीहंडीफेम नेत्याच्या छत्राखाली
By Admin | Published: October 29, 2015 12:41 AM2015-10-29T00:41:33+5:302015-10-29T00:41:33+5:30
कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येसंदर्भात अटकेची टांगती तलवार मानेवर असलेल्या नगरसेवकांच्या चौकडीने आपल्यावरील कारवाई टाळण्याकरिता ठाण्यातील
अजित मांडके, ठाणे
कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येसंदर्भात अटकेची टांगती तलवार मानेवर असलेल्या नगरसेवकांच्या चौकडीने आपल्यावरील कारवाई टाळण्याकरिता ठाण्यातील एका दहीहंडीफेम नेत्याच्या छत्रछायेचा आसरा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या आमदाराने उच्च न्यायालयात या नगरसेवकांकरिता चार तज्ज्ञ वकिलांची फौज तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परमार आत्महत्येप्रकरणी सुधाकर चव्हाण यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २९ आॅक्टोबर रोजी आणि विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची ३१ रोजी होणार आहे. परंतु, हा जामीन अर्ज फेटाळला तर पुढे काय, असा सवाल उभा राहिल्यानेच या चौकडीने दहीहंडीफेम नेत्याकडे धाव घेतल्याचे नगरसेवकांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मनसे, काँग्रेसने केले हात वर
परमार प्रकरणात मनसेचे सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांची नावे पुढे आल्यानंतर मनसे आणि काँग्रेसने या प्रकरणात हात वर केले आहेत. या प्रकरणाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे या दोन नगरसेवकांपुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मदतीने त्या दहीहंडीफेम नेत्याला शरण जाण्याचा मार्ग पत्करला आहे, असे कळते. मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची एक वर्षापूर्वीच गटनेतेपदावरून हकालपट्टी झाली होती. त्यांचे गॉडफादर हे पक्षप्रमुख राज ठाकरे हेच मानले जात होते. परंतु, त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली.
काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांना माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यामुळेच गटनेतेपद मिळाले होते, परंतु पक्षाच्या विरोधात जाऊन काही कृत्ये केल्याने त्यांची या पदावरून हकालपट्टी झाली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या या कारवाईनंतर ते राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात अधिक आहेत. किंबहुना, मुल्ला यांच्या संपर्कात अधिक असल्याचेच समजते. आता काँग्रेसनेही हात वर केल्याने चव्हाणांनीदेखील अन्य तीन नगरसेवकांचे अनुकरण केले आहे.
अन्य नगरसेवकांचीही चौकशी सुरू
ठाणे : पोलिसांनी पालिकेतील आणखी काही नगरसेवकांची बुधवारी चौकशी केली. तिच्या आधारे ‘त्या’ चार नगरसेवकांबाबत आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर, नगरसेवक नारायण पवार यांच्यासह अन्य काही सदस्यांना बोलवले होते. ठाणे महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांनाही लवकरच चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी अन्य काही नगरसेवकांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसाही बजावल्या आहेत.
मला तपासकामी पोलिसांनी बोलवले होते, परंतु कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मी आज जाऊ शकलो नाही. तपासकामी पोलिसांना सहकार्य करेन असे स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीची पद्धत चुकीची होती. नोटिसा बजावून अशा पद्धतीने बोलवणे अयोग्य आहे. असे काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितले. तर पोलिसांनी पत्र पाठवून तपासकामी सहकार्य करण्यासाठी बोलवले होते. त्यानुसार, बुधवारी हजर राहिलो होतो असे कॉंग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर म्हणाले. दरम्यान घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून त्यांची तीन दिवसांत माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.