‘ते’ दोन हजार कोटींचे इफे ड्रिन होणार नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:25 AM2018-06-09T01:25:37+5:302018-06-09T01:25:37+5:30
ठाणे न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील सुमारे दोन हजार कोटी किमतीचे २१ टन इफे ड्रिन नष्ट करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील सुमारे दोन हजार कोटी किमतीचे २१ टन इफे ड्रिन नष्ट करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे. त्याबाबतचे पंचनामे करण्याचे काम शुक्रवारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोलापूर एमआयडीसी भागातून इफेड्रिन अर्थात ईडीचा मोठा साठा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने दोन वर्षांपूर्वी पकडला. अमली पदार्थांची माहिती मिळाल्यानंतर थेट एखादी कंपनीच मिळणे, त्या ठिकाणी एकाच वेळी साडेअठरा टनांपेक्षा जास्त मुद्देमाल मिळणे, ही संपूर्ण देशभरातील पहिलीच घटना होती. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेवाळे, उपनिरीक्षक अमोल वालझडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्यासह १५ ते २० जणांचे पथक सोलापुरात आहे. पंचनाम्यानंतर इफेड्रीलन सोलापूर येथून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे आणून ९ ते ११ जून दरम्यान नष्ट करण्यात येईल.
अद्यापही फरार
अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हादेखील या प्रकरणात आरोपी आहे. कंपनीच्या मुख्य संचालकांसह १५ जणांना यामध्ये अटक करण्यात आली आहे, तर ममता कुलकर्णीसह चार जणांचा अजूनही याप्रकरणी शोध घेण्यात येत
आहे.