चोरीसाठी कारमधून आलेल्या चोरटयास अटक: कारसह सीसीटीव्हीही जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:45 PM2020-09-11T23:45:24+5:302020-09-11T23:48:03+5:30
कोणाला संशय येऊ नये म्हणून चक्क कारमधून चोरीसाठी आल्यानंतर कारनेच परत गेलेला चोरटा अखेर त्याच कारच्या क्रमांकाच्या आधारे ठाणे पोलिसांच्या हाती लागला. ही कार आणि त्याने चोरी केलेला सीसीटीव्ही कॅमेराही वागळे इस्टेट पोलिसांनी जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वागळे इस्टेट येथील उच्चभ्रू गृहसंकुलात शिरण्यासाठी एका चोरटयाने कारचा उपयोग केला मात्र सीसीटी्रव्हीच्या आधारे तो पकडला गेला. अनुप ओमप्रकाश राज (२५, रा. भांडूप, मुंबई) असे या चोरटयांचे नाव असून त्याला वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली मोटारकार आणि चोरीतील सीसीटीव्ही कॅमेरा असा ८२ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट रहेजा गार्डन, सोसायटीचे रहिवाशी जयेश वाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २८ आॅगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास रहेजा गार्डन सोसायटीच्या कार्यालयाजवळील एका सीसीटीव्हीची अनोळखी चोरटयांनी चोरी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र फड आणि उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये घटनास्थळी मिळालेल्या अन्य एका सीसीटीव्हीमध्ये एका कारने संशयित चोरटा आल्याचे निदर्शनास आले. या कार मालकाचा शोध घेतल्यानंतर ही कार अनुपने खासगी प्रवासी वाहतूकीसाठी त्यांच्याकडून घेतल्याचे उघड झाले. अनुपचा शोध घेतल्यानंतर रहेजा कॉम्पलेक्समध्ये शिरण्यासाठी सहज शक्य नसल्यामुळे आपण या कारचा वापर केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर या संकुलातील एक मोटारसायकल चोरण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यात अयशस्वी झाल्यानंतर अखेर एका सीसीटीव्हीची चोरी करुन तो पसार झाला हाता. मात्र, अन्य एका सीसीटीव्हीतून त्याचे भिंग फुटले. त्याला २९ आगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली कार आणि सीसीटीव्ही कॅमेराही हस्तगत करण्यात आला आहे. त्याला १४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.