चोरट्याला महिलेने शिकवला धडा
By admin | Published: January 28, 2017 02:50 AM2017-01-28T02:50:27+5:302017-01-28T02:50:27+5:30
मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या चोरट्यास महिलेने पकडून चांगला धडा शिकवल्याची घटना गुरुवारी रात्री कल्याणमध्ये घडली आहे.
कल्याण : मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या चोरट्यास महिलेने पकडून चांगला धडा शिकवल्याची घटना गुरुवारी रात्री कल्याणमध्ये घडली आहे.
देवयानी हेगिष्टे (२६, रा. वैष्णवी आर्केड, रा. आंध्रा बँकेसमोर, कल्याण पश्चिम) या रमाबाई आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याने साईबाबानगरातील नातेवाइकांकडे रात्री ८.१५ च्या सुमारास जात होत्या. त्या वेळी समोरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यावर थाप मारत त्यांचे पाच तोळ्यांचे एक लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. त्यांनी धाडसाने त्याचा पाठलाग करत त्याच्या हातातून मंगळसूत्र खेचून घेतले. त्याला पकडून आरडाओरड केली. आसपासच्या नागरिकांनी त्याला पकडले. त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी हेगिष्टे यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी मोहम्मद हुसेन अब्दुल रहेमान शेख (३५, रा. भिवंडी) या लुटारूविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत सोनसाखळी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)