वर्तकनगर पोलीस ठाण्यातून निसटलेल्या ‘त्या’ चोरट्यास अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:27+5:302021-08-28T04:44:27+5:30
ठाणे : चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक रहिवाशांनी पकडून वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर, चौकशीदरम्यान पाणी पिण्याच्या बहाण्याने पसार झालेल्या प्रमोद मयेकर ...
ठाणे : चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक रहिवाशांनी पकडून वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर, चौकशीदरम्यान पाणी पिण्याच्या बहाण्याने पसार झालेल्या प्रमोद मयेकर (४७, रा. मुंबई) याला वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वर्तकनगर परिसरात गेल्या दोन वर्षांपासून महानगर गॅसची जोडणी सुरू आहे. गॅसच्या मीटर रीडिंगच्या बहाण्याने खोटे ओळखपत्र दाखवून घरामध्ये शिरून चोरी करणे किंवा एटीएम कार्ड चोरून एटीएममधून पैसे काढण्याचे प्रकार या भागात घडले आहेत. या परिसरातील दक्ष नागरिकांनी प्रमोद मयेकर (४७, रा. मुंबई) या संशयिताला १७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी पकडून वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले होते.
मात्र, चौकशीदरम्यान त्याने पाणी पिण्याचा बहाणा करीत पलायन केले. याप्रकरणी चौकशीची मागणी शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे केली होती. प्रमोद याने रामचंद्र पवार (६८, रा. शिवाईनगर, ठाणे) यांच्याकडे ४ ऑगस्ट २०२१ रोजी गॅस पाईप मस्टर रीडिंगसाठी आल्याचा बहाणा करीत एटीएम कार्डची चोरी केली. त्याच एटीएम कार्डद्वारे ३५ हजारांची रक्कम काढली होती. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. जाधव यांच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास प्रमोद याला मुंबईच्या वडाळा भागातून अटक केली. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
* प्रमोद हा वडाळा येथे येणार असल्याची टीप खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला अटक केली आहे.
- संतोष घाटेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे.