एक किलोमीटर पाठलाग करून पकडले चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:01 AM2019-04-04T03:01:57+5:302019-04-04T03:02:01+5:30
वाहतूक पोलिसांची कामगिरी : तीन मोबाइल हस्तगत, गुन्हा दाखल
ठाणे : वाहतूककोंडीमुळे थांबलेल्या चारचाकी वाहनांची काच ठोठावून गाडीतील मोबाइल चोरणाऱ्या एका दुकलीला ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एक किलोमीटर पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून तीन मोबाइल फोन हस्तगत केले आहेत. त्यांना कापूरबावडी पोलिसांच्या हवाली केले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये कुणाचे मोबाइल चोरीला गेले असतील, तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कासारवडवली येथील रहिवासी प्रवीण गुप्ता हे २ एप्रिल रोजी सायंकाळी कापूरबावडी वाहतूक विभागाजवळ थांबले होते. इम्रान इक्बाल कुरेशी (४०, रा. नेरळ) आणि निलेश अशोक रांजणे (३५ रा, विरार) यांनी गाडीचा दरवाजा ठोठावून गुप्ता यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. त्यावेळी गोल्डन डाइजनाका येथे वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत, पोलीस नाईक संजय नागरे, थोरात आणि पोलीस शिपाई श्रीकांत वानखेडकर, पोलीस शिपाई आंधळे आदींनी जवळपास एक किलोमीटरपर्यंत दोघांचा पाठलाग करून त्यांना गोकुळनगर परिसरात पकडले. वाहतूक पोलिसांनी ५० हजार, २० हजार आणि पाच हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल हस्तगत करून त्यांना कापूरबावडी पोलिसांच्या हवाली केले. गुप्ता यांच्या तक्रारीनंतर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी.एस. पवार पुढील तपास करत आहेत. कापूरबावडी व चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.