ठाण्यात दुकानातून मोबाईल चोरणारे सराईत चोरटे जेरबंद, २ लाख ४० हजारांचे १८ मोबाईल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:54 PM2023-01-09T18:54:23+5:302023-01-09T18:55:58+5:30
ठाणे - बतावणी करुन तसेच दुकानांचे शटर उचकटून मोबाईलची चोरी करणाऱ्या मोहम्मद कासीम शेख (४१, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे ...
ठाणे - बतावणी करुन तसेच दुकानांचे शटर उचकटून मोबाईलची चोरी करणाऱ्या मोहम्मद कासीम शेख (४१, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) याच्यासह दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून दोन लाख ४० हजारांचे १८ मोबाईल आणि १४ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
कपडयाच्या दुकानात कामाला लावण्याचे अमिष दाखवून ठाण्यातील नौपाडा भागातील एमटीएनएल चौकात बोलवून शिवम सिंग (२०, रा. मानखुर्द, मुंबई) आणि आशिष शर्मा या दोघांना एका अनोळखी भामटयाने बोलण्यात गुंतवून ३५ हजारांचे तीन मोबाईलची चोरी केली होती. याप्रकरणी ४ जानेवारी २०२३ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ आणि निरीक्षक आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जसदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे आणि पोलीस नाईक समाधान माळी आदींच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोहम्मद कासीम शेख याला डोंबिवलीतून ताब्यात घेतले. चौकशीतून त्याने या चोरीची कबूली दिल्यानंतर त्याला ५ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील १८ मोबाईल जप्त केले. या गुन्हयासाठी १२ वेगवेगळया मोबाईल सीमकार्डचा वापर केल्याची माहिती उघड झाली. त्याच्याविरुद्ध नौपाडयासह मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारचे फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुकान फोडून रोकड लांबविणारा अटकेत
ठाण्यातील मखमली तलावाजवळ असलेल्या चेतन दोशी (५३, रा. मुलूंड, मुंबई) यांच्या दुकानाचे २८ डिसेंबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास चोरटयांनी शटर उचकटून एक लाख ५८ हजारांच्या रोकडची चोरी केली होती. या प्रकरणातही नौपाडा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर संतोष कांबळे (३६, रा. क्रांतीनगर, ठाणे) याला जळगाव जिल्हयातील जामनेरमधील पहूर गावातून ६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील १४ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. तो सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध ठाणेनगर, राबोडी आणि नौपाडा आदी पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.