समतेचा विचार संतकाळापासून
By admin | Published: June 28, 2017 03:16 AM2017-06-28T03:16:29+5:302017-06-28T03:16:29+5:30
महिलांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार संतकाळातच मिळाला. सध्या समाजामध्ये ज्या समतेचा विचार पुढे आणला जात आहे
लोकतम न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : महिलांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार संतकाळातच मिळाला. सध्या समाजामध्ये ज्या समतेचा विचार पुढे आणला जात आहे त्याची खरी सुरूवात ही संत काळापासूनच झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संतपरंपरा अभ्यासणे आवश्यक असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांनी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे ५५ वे राज्यस्तरीय संमेलन नुकतेच अंबरनाथ येथे झाले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध कार्यक्र म झाले. संमेलनाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी आप्पा परब यांनी विरत्वाचा इतिहास समोर उभा केला. तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रबोधनात संत साहित्याचे योगदान या विषयावर बोलताना पवार यांनी संत परंपरा श्रोत्यांसमोर विषद केली. संतांच्या विचारांनी प्रेरीत होत किर्तनकार, शाहीर यांनीच महाराष्ट्राला शहाणे केले. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संत परंपरा अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्याच्या साडेसातशे वर्षाच्या इतिहासात साडेचारशे वर्ष हे संत साहित्याचे आहेत. त्यामुळे मराठी साहित्यही संतांशिवाय अपूर्ण आहे. मागासवर्गीयांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी सर्वप्रथम संतांनीच प्रयत्न केले. तर महिलांना ज्ञान, संतविचार जाणून घेण्याचा हक्कही त्या काळातच मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
शेवटच्या सत्रात ‘वृत्तपत्र लेखक समाजातील जागल्या’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी पत्रकारितेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल अजित म्हात्रे, प्रशांत मोरे, गिरीश त्रिवेदी, श्रीकांत खाडे, शरद पवार, गणेश गायकवाड यांचा सेवा साधना पुरस्काराने गौरव केला.