पात्र शिक्षकांचा विचार करा; अन्यथा आंदोलन
By admin | Published: September 17, 2016 01:57 AM2016-09-17T01:57:41+5:302016-09-17T01:57:41+5:30
अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अडचणीचा ठरत असतानाच शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यात मात्र प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा अनेक महिन्यांपासून रिक्त
भातसानगर : अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अडचणीचा ठरत असतानाच शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यात मात्र प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते होऊ नये म्हणून गटशिक्षणाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकांच्या मागणीला सामोरे जाताना मात्र ही भरती करताना तालुक्यातील पात्र शिक्षकांचाच विचार करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या धोरणानुसार विद्यार्थी संख्येनुसार शहापूर तालुक्यात वाढीव पदांना मंजुरी मिळायला हवी होती. मात्र, ती आजपर्यंत मिळाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. तालुक्यात १२३२ मंजूर पदे असून त्यापैकी आजही ८३ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तालुक्यातील एकूण संख्येचा विचार करता आरटीआय शिक्षण हक्क कायद्यानुसार १०२ पदे नवीन तयार होऊन त्यांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र, ती मिळत नाही. शिवाय, रिक्त पदेही भरली जात नसल्याने अनेक शाळांना कमी शिक्षक संख्येनुसार काम करावे लागत आहे. या मंजूर ८३ पैकी ३ पदे ही मुख्याध्यापकांची असल्याने ती भरणार कधी, अशी विचारणा सर्वत्र होत आहे.
याविषयी गटशिक्षणाधिकारी आशीष झुंजारराव यांना विचारले असता त्यांनी या रिक्त पदांची माहिती जिल्ह्याला कळवल्याचे सांगितले.