तिसऱ्या दिवशी देखील अंबरनाथ महसूल कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 05:55 PM2017-10-12T17:55:53+5:302017-10-12T17:55:56+5:30
येथील तालुका महसूल विभागाच्या नायब तहसीलदारसह, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी 10 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. तिसऱ्यादिवशी देखील आंदोलन सुरुच राहिल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे.
अंबरनाथ : येथील तालुका महसूल विभागाच्या नायब तहसीलदारसह, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी 10 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. तिसऱ्यादिवशी देखील आंदोलन सुरुच राहिल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांच्या कामावर होताना दिसत आहे.
या आंदोलनात कोकण विभागासह राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी - कर्मचारी सहभागी झाली आहेत. अंबरनाथ तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे 22 कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. महसूल विभागीत कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतात पण प्रशासकीय कोणतेही काम या आंदोलनादरम्यान करत नाहीत. आधीच राज्यभरातील पुरवठा कर्मचा-यांनी दहा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासह प्रलंबित असलेल्या आवश्यक मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे.
महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करणो,नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4800 करणे, अव्वल कारकून वर्ग -3 या संवर्गाच्या वेतन श्रेणी मधील त्नुटी दूर करणो यासह अन्य मागण्या शासनाने 2014 मध्ये तत्वत: मान्य करून मागण्या संदर्भात शासन निर्णय निर्गिमत करण्याचे आश्वासन दिले होते. या करीता राज्य कार्यकारिणीने वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासन स्थरावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने संघटनेने हे असहकार आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती अंबरनाथ तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश राणो यांनी दिली. कर्मचारयांच्या प्रलंबित मागन्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन आहे, त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन संघटनेचे सचिव प्रशांत कुमावत यांनी केले आहे. या आंदोलनाच्या दुस-या दिवशी देखील कामकाज बंद राहिल्याचे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडलेली आहेत.